खारेबांद-मडगाव येथील प्रकार
प्रतिनिधी/ मडगाव
खारेबांद-मडगाव येथे भंगार गोळा करणाऱया दोन मित्रांमध्ये शनिवारी रात्री 11.30च्या दरम्यान, पैशांच्या देवाण-घेवाण वरून भांडण झाले. त्यात एकाने दुसऱयाला सुऱयाने भोसकून खून केला. खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, मडगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासात त्याचा शोध लावून अटक केली.
शनिवारी रात्री मडगाव पोलिसांना पीसीआरमार्फत खारेबांद येथे दोघांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. मडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पण त्यांना कोणीही सापडला नाही. नंतर घटनास्थळाजवळील बारचे मालक जोसेफ कुलासो यांनी पोलिसांना माहिती दिली की, रात्री 11.15 वा. जॉनसन बारजवळ, खारेबांद येथे फुटपाथवर राहणारे दोन मजूर / भंगार गोळा करणारे यांच्यात भांडण झाले. त्यात येल्लाप्पा करबळ याने कुमार नावाच्या भंगार गोळा करणाऱया इसमाला चाकूने भोसकले. कुमार याने जखमी अवस्थेत असताना ही माहिती बार मालकाला दिली.
कुमार हा जबर जखमी झाल्याचे पाहून येल्लाप्पा करबळ हा घटनास्थळावरून पळून गेला. कुमारला मृत्यू आल्याने मडगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 302 कलमा खाली येल्लाप्पाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यानंतर मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या देखरेखीखाली ताबडतोब एक पथक तयार करण्यात आले आणि त्यात पोलीस उपनिरीक्षक सागर धाटकर, उपनिरीक्षक विश्वजीत ढवळीकर, हेड कॉन्स्टेबल समीर नागनुरी, हेड कॉन्स्टेबल दिलखुश वेळीप, पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ गवस, पोलीस कॉन्स्टेबल विशाल प्रभू, कपलेश खोलकर, पोलीसि कॉन्स्टेबल ऑरलँडो फर्नांडिस यांचा समावेश होता.
या पथकाने येल्लाप्पा याची शोध मोहिम सुरू केली. मडगाव शहरात शोध मोहिम राबविली असता सुमारे तीन तासांच्या सखोल तपासानंतर आरोपी शहरातून पळ काढण्याच्या प्रयत्नात रेल्वे रुळाजवळ आरोपीला सापडला.
त्यानंतर आरोपीची जबानी नोंद करून घेण्यात आली असता, 1000 रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्याने दोन्ही मित्रांमध्ये भांडण झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह टीबी हॉस्पिटलच्या शवागरात जतन करण्यात आला आहे. आज सोमवारी शवचिकित्सा केली जाणार आहे.