प्रतिनिधी
पणजी
गोव्यात बनावट नोटा चलनात आणण्याचे काम गेल्या सात दिवसांपासून सुरु होते. सात दिवसात किती बनावट नोटा चलनात आणण्यात संशयित यशस्वी झाले याचा तपास पणजी पोलीस करीत आहेत. तीन लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा आणल्या होत्या, असे संशयितांनी पोलिसांसमोर उघड केले आहे. मात्र त्यांच्या सांगण्यावर पेलिसांचा विश्वास बसत नसून किती बनावट नोटा चलनात गेल्या याचा पोलीस कसून तपास करीत आहेत. ही राष्ट्रीय पातळीवरील टोळी असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचे तपासकाम राष्ट्रीय तपासयंत्रणा (एनआयए) आपल्या हाती घेण्याची शक्यता आहे.
सोमवारी पणजी पोलिसांनी संशयित राजदीप, गंगादीप, हरजित, राहूल, अनुराग या पाच संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 96 हजार 400 रुपये किमंतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये 129 नोटा 2000 रुपयांच्या आहेत. तसेच 100 व 200 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे. संशयितांचे मोबाईल संचही जप्त करण्यात आले आहेत. बनावट नोटा कुठून आणल्या होत्या आणि नक्की किती होत्या याचा खुलासा संशयितांनी अद्याप केलेला नाही. उलटतपासणी दरम्यान संशयित पोलिसांना देत असलेली माहिती संशय निर्माण करणारी आहे.
पाचही संशयितांना मंगळवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोमवारी संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्या वारेधात भादंसं 489 ए, 489 बी व 489 सी कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी सकाळी त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या बनावट नोटा प्रकरणात एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील मोठय़ा टोळीचा भाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत असून त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. 4 सप्टेंबरला संशयित आपल्या नातेवाईकांसोबत चंदीगडहून गोव्यात येण्यासाठी निघाले होते. पंजाब सरकारच्या वाहतूक खात्याकडे नोंद असलेल्या दोन स्कॉर्पिओ खाजगी गाडय़ा घेऊन ते गोव्यात आले होते. सहा सप्टेंबर रोजी संध्याकाळी ते गोव्यात पोचले हेते. कळंगुट येतील एका व्हिलामध्ये ते राहिले. 14 सप्टेंबरपर्यंत गोव्यात राहून 15 सप्टेंबरला ते परत जाणार होते. त्या अगोदरच पोलिसांनी त्यांचा पर्दाफाश करून संशयितांना गजाआड केले.
संशयित घेऊन आलेल्या गाडय़ाही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सात सप्टेंबर सकाळपासून त्यांनी गोव्यात बनावट नोटा चलनात आणणे सुरु केले होते. एखाद्या दुकानात जाऊन कोणती तरी वस्तू घ्यायची आणि दोन हजार रुपयांची बनावट नोट देऊन राहिलेले पैसे घेऊन जाणे ही त्यांची चालाखी होती. 4 सप्टेंबरला चंदीगडहून गोव्यात यायला निघाल्यानंतर वाटेत त्यांनी किती बनावट नोटा चलनात आणल्या याचही पोलीस तपास करीत आहेत. गोव्यात पर्वरी, पणजी परीसरात बनावट नोटा चलनात आणल्याचे संशयितांनी कबूल केले आहे.
सात सप्टेंबर पासून दर दिवशी पाचही संशयित विविध ठिकाणी जायचे आणि बनावट नोटा चलनात आणत होते. त्याच दरम्यान नेरूल येथे एका दुकानदाराला बनावट नोट मिळाली होती त्यांने त्या बाबत पोलिसांना माहिती दिली होती. तेव्हापासून पणजी पोलीस संशयितांच्या शोधात होते. सोमवारी संशयित हरजीतसिंग व गंगादीप हे दोघेही स्कॉर्पीओ गाडी घेऊन बनावट नोटा चलनात आणण्यासाठी पणजीत आले होते. त्यांनी एका दुकानात बनावट 2000 हजार रुपयांची नोट दिली होती. तेव्हाच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना त्यांच्या सोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह इतर नऊ जणांना ताब्यात घेतले होते. सर्व घटनांची तपासणी करून पाच संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली व इतरांचा गुह्यात सहभाग नसल्याचे आढळून आल्याने त्यांना सोडण्यात आले. होते.