देशात दिवसभरात 24 हजार 882 नवे रुग्ण- 140 रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात नव्या बाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र आणि केरळात कोविड-19 ची सर्वात जास्त पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय, तामिळनाडू, पंजाब आणि दिल्लीमध्ये सुद्धा कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. नव्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा दोन लाखांवर पोहोचली आहे.
आतापर्यंत 22 कोटी 58 लाख 39 हजार 273 नमुन्यांची कोरोना तपासणी झाली. यापैकी 8 लाख 40 हजार 635 नमुन्यांची कोरोना तपासणी मागील 24 तासात करण्यात आल्याची माहिती ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली आहे. चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने रुग्णसंख्येतही भर पडलेली दिसत आहे. भारतात कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील चोवीस तासात 24 हजार 882 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 140 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19 हजार 957 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णवाढीमुळे देशात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 13 लाख 33 हजार 728 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 1 कोटी 09 लाख 73 हजार 260 इतका झाला आहे. नवे रुग्ण वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्या शनिवारी सकाळी 2 लाख 2 हजार 22 इतकी झाली होती.
देशात 2.82 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
दिलासा देणारी एक मोठी बाब म्हणजे देशात 2.82 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले. मागील 24 तासांमध्ये देशात 20.53 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत 70 हजार 504 आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना (हेल्थ केअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 1 लाख 37 हजार 745 आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना (हेल्थ केअर वर्कर्स) कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे.