युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषिकांची आस्थापने व मराठी भाषिकांना लक्ष्य बनवून त्यांच्यावर हल्ले करणाऱया समाज कंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याकडे केली आहे.
शनिवारी शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, अंकुश केसरकर, सुरज कुडुचकर, श्रीकांत कदम आदींसह कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले असून कन्नड फलकांसाठी सुरू असलेला धुडगूस व मराठी फलकांवर काळे फासून फलक फाडण्याचे प्रकार याकडे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
शुक्रवारी शिवसेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. महामार्गावरील गावकरी व कावेरी या हॉटेलचे फलक फाडण्यात आले आहेत. शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बेळगावात बहुसंख्येने मराठी भाषिक आहेत त्यांचा व्यवहारही जास्तीतजास्त मराठी भाषेत चालतो. मात्र समाज कंटकांकडून हल्ले होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यात येत आहे, अशी तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.