“सखुबाईला काय करायची, समजत नसतं रे,’’ आमचा बालमित्र जग्गू जगजंपी करवादत होता.
“काय झालं, जग्गू? तुझी वाकडी नजर आता मोलकरणीवर पडली काय रे?’’
“मी तिच्याकडं चोरून पण बघत नसतं रे, पण ती माझं आणि नंदिनीचं सगळं डायलॉग चोरून ऐकतंय.’’
“पण या वयातही सखुबाईला चोरून ऐकावंसं वाटतं, अशा चावट गोष्टी तुम्ही बोलता, याचं नवल वाटतं हो. तुझं ठीक आहे. वहिनींचं काय? तुला मी आज ओळखत नाही. ऑफिसमध्ये गूळपाडय़ा म्हणून तू बायकांमध्ये फेमस होतास. वास्को द गामा भारतात येताना केप ऑफ गुड होपला वळसा घालून आला. तू केबिनमधून निघाल्यावर स्टाफला भेटण्याआधी एका ठरावीक महिलेच्या टेबलपाशी गूळ काढून मगच पुढे जायचास. त्यावरून त्या बिचारीला सगळे केप ऑफ गुड होप म्हणून चिडवू लागले. शेवटी तिनं बदली करून घेतली.’’
“जुनं इतिहास का काढतंस रे.’’
“पण तू आणि वहिनी या वयात असं काय खास बोलता की ते तुझ्या सखुबाईला चोरून ऐकावंसं वाटतं?’’
“तू समजतंय तसं चावट बोलत नसतं रे. मुलगा आणि सून कधी येणार हे निरोप नंदिनी मला सांगितलं तर सखुबाई चोरून ऐकतं आणि त्या दिवशी भांडी जास्त असणार म्हणून दांडी मारतंय.’’
“तुम्ही अशा गोष्टी मोठय़ा आवाजात न बोलता एकमेकांना एसेमेस का करीत नाही?’’
“ते शक्मय नसतंय. सखुबाई आलं की स्वतःचं फोन चार्जिंगला लावतं आणि ब्याल्लंस संपला म्हणून आमचं फोन घेऊन मैत्रिणींना फोन करतं. फोनवर बोलून झालं की आमचं एसेमेस, व्हॉट्सअप मेसेज वाचतं. आमचं सखुबाई म्हणजे पक्कं पेगासीस असतंय.’’
“पेगासीस म्हणजे? ही काय भानगड आहे?’’
“ते काहीतरी इजिप्तच्या लोकांनी नवीन मशीन काढलंय. ते कानाला लावलं की आपल्याला दुसऱयाच्या फोनमधलं ऐकायला, वाचायला मिळतंय.’’
“हो का?’’ “परवा सखुबाई टीव्हीवरचं बातमी बघून मला विचारली की पेगासीस म्हणजे काय असतंय, ते हेपाटायटीससारखं व्हेक्सीन किंवा स्पॉन्डिलायसिससारखं दुखणं असतंय का. मी अर्थ सांगितल्यावर तिनं हे मशीन घ्यायचं ठरवलं. मी तिला म्हणालं की मशीन महाग असतंय. तर ती म्हणालं की मशीनचं किंमत सांगा. आता ती त्या किमतीचं भिशी लावणार आहे. आणि भिशीचा हप्ता देण्यासाठी आम्हाला तिचं पगार वाढवावं लागणार आहे.’’