प्रतिनिधी/ पणजी
छातीत दुखू लागल्याने काल बुधवारी सभापती राजेश पाटणेकर यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आपले आरोग्य चांगले असून गोमेकॉतील भेट ही रुटीन असल्याचे पाटणेकर यांनी स्पष्ट केले आहे.
अगोदरच रुटीन चेकअपसाठी वेळ निश्चित केली होती व त्यानुसार गोमेकॉत आपण गेलो होतो. मात्र डॉक्टरांनी अन्य काही चाचण्या करण्यासंदर्भात सल्ला दिल्याने गोमेकॉत दाखल करून घेतले, असेही पाटणेकर यांनी म्हटले आहे. आता आपली प्रकृती उत्तम आहे. लवकरच आपण पुन्हा लोकांच्या सेवेत येणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कुणीही आपल्या भेटीसाठी गोमेकॉत येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान रात्री उशिरा गोमेकॉचे असोसिएट प्रोफेसर कार्डिओलॉजी डॉ. मंजुनाथ देसाई यांनी जारी केलेल्या बुलेटिननुसार पाटणेकर हे मधुमेही असून त्यांना कोरोनरी आर्टरीचा आजार आहे. त्यांच्यावर 2014 साली गोमेकॉत अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता ह्य्दय क्रियेचा आढावा घेण्यासाठी त्यांना गोमेकॉत दाखल करुन घेण्यात आले असून आयसीयूमध्ये त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण व उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असून निरीक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. संपूर्ण निरीक्षण होईपर्यंत त्यांना काही दिवस इस्पितळात रहावे लागणार आहे.