गौरी आवळे / सातारा :
समाजाशी नाळ जोडून गरीब, गरजु यांचा आधार बनलेल्या शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका हेमलता लक्ष्मण शिंदे समाजकार्यातील क्रांतीज्योत बनल्या आहेत. 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण हा हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला जीवन मंत्र त्यांनी अंगीकारला आहे. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे, उपक्रम तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी हेमलताताईंची नेहमी धडपड असते.
गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत हेमलता लक्ष्मण शिंदे यांनी समाजकार्यात वाटचाल सुरू केली. 100 नव्हे तर 101 टक्के त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासले आहे. सातारा जिह्यातील खटाव या गावातील ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा विडा त्यांनी उचलला. मुलीचे शिक्षण, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या, महिलावर होणारे कौटुंबिक हिंसाचार या घटना महिलांचे खच्चीकरण करत होत्या. महिलांना कायदेविषयक ज्ञान नसल्याने त्या आवाज उठवू शकत नव्हत्या. या महिलांना एकत्र करून त्यांनी कायदेविषयक जनजागृती केली. स्वखर्चातून त्यांना कायदेशीर मदत पोहचवली. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी अनेक शिबिरे राबविली. मतीमंद, गतीमंद, दिव्यांगासाठी त्या नेहमी मदतीचा हात पुढे करतात. त्यांनी शासनाच्या योजना मिळवून दिल्या. त्यांच्या रोजगारासाठी नवीन धोरणे राबविली आहेत.
शिवसेना पक्षाच्या त्या महिला आघाडीच्या जिल्हा उपसंघटिका आहेत. पक्षात काम करताना त्या सर्व पदाधिकारी, महिला यांना सोबत घेवून काम करतात. राजकारणात असूनही सामाजिक कार्य करणे हा एकाच हेतून त्या समोर ठेवून वाटचाल करत आहेत. त्यांच्या कामाचा डंका सर्वत्र आहे. त्यांचे पती लक्ष्मण शिंदे हे त्यांच्या प्रत्येक कार्यात आपला सहभाग नोंदवतात. पती खंबीरपणे साथ देत असल्याने त्यांना लढण्याचे आणखी बळ मिळत आहे. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला समाजकार्याची आवड आहे.
त्या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सातारा जिल्हा निरीक्षक महिला विभाग म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात काम करताना त्यांनी घेतलेले अनुभव सर्व महिलांसाठी प्रेरणादायी बनल्या आहेत.
समाजासाठी आपले योगदान महत्त्वाचे…
समाजात काम करताना अनेक अनुभव मनात साचून आहेत. ते अनुभव आणि सामाजिक, राजकीय प्रवास हा माझ्या जीवनाचा भाग बनला आहे. मला आजच्या मुली, महिलांना सक्षम होण्याचा संदेश द्यायचा आहे. तसेच खडतर प्रवास हा यशाचा खरा मार्ग आहे. तुमचा संघर्ष तुमची ओळख घडविणार आहे.
– हेमलता शिंदे,
महिला आघाडी उपसंघटिका, शिवसेना