प्रतिनिधी / मडगाव
आमचे गोंय आमचो लोक या स्वयंसेवी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी तथा समाजसेवक वॉल्टर डायस (50) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने काल शनिवारी सकाळी निधन झाले. ते मांडप-नावेली येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी व चार बंधू असा परिवार आहे.
दक्षिण गोव्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा एनजीओ फेलिक्स डायस यांचे ते बंधू होत. वॉल्टर डायस यांनी अनेक वेळा रक्तदान करून मोलाचे योगदान दिले होते. तसेच सद्या कोविड-19च्या लॉकडाऊनमध्येही त्यांनी गरजू लोकांना किराणा माल पुरवून मदतीचा हात दिला होता. इतरांना मदत करण्यात ते नेहमीच तत्पर असायचे. काल शनिवारी सकाळी सुद्धा त्यांनी आपल्या मित्राच्या इथे काही कामगारांना नेले व त्यांना कामाच्या ठिकाणी सोडून परत येत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.