प्रतिनिधी/ बेळगाव
समादेवी गल्ली येथील एका रहिवाशाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून नैराश्येच्या भावनेतून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनय बसवराज बागी (वय 52, रा. समादेवी गल्ली) असे त्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. रविवारी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनयची पत्नी बेंगळूरला आहे. मुलगा कामानिमित्त बाहेग गेला होता. त्यावेळी नैराश्येच्या भावनेतून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे पुढील तपास करीत आहेत.