इस्रायलमध्ये पाणबुडय़ांना गवसला खजिना
एकाहून एक सरस पुरातात्विक सामग्रीला स्वतःच्या आत सामावून घेतलेल्या इस्रायलमध्ये समुद्राच्या तळावरून एक 900 वर्षे जुनी तलवार सापडली आहे. इस्रायलच्या प्राचीन वस्तूंच्या प्राधिकरणाने एका पाणबुडय़ाला ही तलवार देशाच्या उत्तर किनाऱयावरून मिळाल्याची माहिती दिली आहे. हे ऐतिहासिक तलवार एखाद्या सैनिकाची असून त्याने इस्रायलच्या भूमीवर धर्मयुद्ध लढले होते असे मानले जात आहे.
अटलिटचे रहिवासी श्लोमी काटजिन कार्मेल समुद्राच्या तळावरील सौंदर्याचा आनंद घेत होते. याचदरम्यान त्यांना ही तलवार दिसून आली. त्यांनी पूर्ण घटनेची चित्रफितही तयार केली आहे. काटजिन यांनी ही तलवार प्राचीन वस्तूंच्या उत्तर जिल्हय़ातील कार्यालयात नेली. त्यांनी ही तलवार राष्ट्रीय कोष विभागात जमा केली आहे. ही तलवार पूर्णपणे सुरक्षित स्थितीत मिळाल्याचे सांगण्यात येतेय.
धर्मयोद्धय़ाची तलवार
ही तलवार अत्यंत सुंदर असून खरोखरच दुर्लभ शोध आहे. तलवार धर्मयुद्धादरम्यान लढलेल्या एखाद्या योद्धय़ाची आहे. ही तलवार प्रथम साफ केली जाईल आणि याचे अध्ययन केल्यावरच ती प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे इस्रायलच्या पुरातत्व अधिकाऱयांनी म्हटले आहे. या तलवारीचे पातं सुमारे 1 मीटर लांबीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या तलवारीची मूठ अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. ही तलवार मिळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हैफा बंदर आहे. तज्ञांनुसार हे ठिकाण एक प्रकारे समुद्रात प्रवास करणाऱया लोकांसाठी एक आश्रय स्थळ होते. समुद्रात इतकी वर्षे राहिल्याने तलवारीवर अनेक गोष्टी जमा झाल्या आहेत.