प्रतिनिधी/ मडगाव
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने समुद्री मासेमारीला बंदी घातली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील सर्व मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा केल्यानंतर समुद्री मासेमारीवर घातलेली बंदी मागे घेतली. तसा अधिकृत आदेश गोवा सरकारच्या मच्छीमारी खात्याने काल शनिवारी जारी केला.
मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करा : डॉ. मोंतेरो
समुद्री मासेमारीवर बंदी घातल्याने गेले काही दिवस गोवेकर ताज्या मासळी पासून वंचित झाले होते. त्यांना आज रविवारपासून मासळी मार्केटमध्ये ताजी मासळी उपलब्ध होणार आहे. मासेमारी करताना व नंतर विक्रीच्यावेळी कोळंबी पैदास केंद्र, ट्रॉलरद्वारे मासेमारी, ट्रॉलर मालक, व्यक्तिगत मासेमारी करणाऱया व्यक्ती काही मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत. या मार्गदर्शकतत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मच्छीमार खात्याच्या संचालिका डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी आवाहन केले आहे.
सामाजिक अंतर ठेवा
मासेमारीचे ट्रॉलर, मच्छीमार सहकारी संस्थांचे मालक, संघटना, व्यक्ती-व्यावसायिक यांनी सामाजिक अंतर ठेवावे आणि मासेमारी संबंधित उपक्रम राबविताना स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. मासेमारीचे ट्रॉलर, मासे उत्पादकांचे मालक यांनी खलाशी तसेच इतर कर्मचाऱयांना हातमोजे, मुखवटे व सेनिटायझर पुरविणे आवश्यक आहे. मच्छीमार जेटीवर माशांचा लिलाव करता येईल. त्यासाठी पद्धतशीरपणे क्षेत्र चिन्हांकित करून सामाजिक अंतर ठेवले जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मच्छीमार जेटीवर माशांच्या किरकोळ विक्रीस परवानगी देण्यात आलेली नाही. ट्रॉलरवर बर्फ, पाणी, रेशन, डिझेल, मासे लोड करणे आणि उतरविणे इत्यादी गोष्टी करताना सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
इन्सुलेटेड वाहनांद्वारे विक्री
स्थानिक मासे विक्रेत्यांनी त्यांच्या इन्सुलेटेड वाहनांद्वारे नियुक्त केलेल्या पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात मासे विक्री करता येईल. तसेच दुचाकी व रिक्षा घेऊन विक्रेत्यांना लोकांना घरपोच मासे विकता येतील. त्याठिकाणीसुद्धा सामाजिक अंतर व स्वच्छतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारपेठेमध्ये मागणी नसलेले मासे, इन्सुलेटेड वाहनांद्वारे ट्रॉलर मालक थेट माशांवर प्रक्रिया करणाऱया स्थानिक तसेच राज्याबाहेरील कंपन्यांना पाठवून देऊ शकतात.
स्थानिक पंचायती व पालिका यांच्याकडून परवानगी बंधनकारक
मासेमारी करणाऱया ट्रॉलरवरील खलाशांची संपूर्ण माहिती ट्रॉलर मालकांना मासेमारीसाठी जाताना व परत आल्यावर जेटीवरील तैनात केल्या जाणाऱया मच्छीमार खात्याच्या अधिकाऱयाला द्यावी लागणार आहे. ट्रॉलर मालकांनी देशातील अन्य कुठल्याही मच्छीमार जेटीवर किंवा पोर्टवर जाऊ नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. ट्रॉलरवरील एखादा खलाशी किंवा कामगार आजारी असल्यास त्याची कल्पना त्वरित आरोग्य खात्याला देणे आवश्यक आहे. कोळंबी पैदास केंद्र तसेच मासळीची शेती करणाऱयांनी, मासळी व्यवसाय करताना सामाजिक अंतर पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे मच्छीमार खात्याने कळविले आहे.
ग्राहकांना मासे विक्री करताना संबंधितानी स्थानिक पंचायती व पालिका यांच्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.