प्रतिनिधी / मडगाव :
सरकारला कोविडची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. स्वतःच्या आमदाराला आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे सरकारला शक्मय होत नाही. सदर ‘रेमडेसव्हीर’ औषध आणण्यास वा त्यासाठी आवश्यक पैसे स्वत:च्या खिशातून देण्यास आपण तयार आहे, अशी प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारने लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरात बसवून ठेवले. मात्र या काळात आवश्यक आरोग्य सुविधा मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले. सरकारने राज्यभर सर्वेक्षण केले होते. त्याचे मग काय झाले, असा सवाल त्यांनी केला.
आपण उगाच प्रतिक्रिया देत नाही. कुंकळ्ळीचे आमदार हे आपले सहकारी आहेत. एरव्ही आपण त्यांच्याशी जास्त संभाषण करत नाही. मात्र कोविडची बाधा झाल्यापासून दररोज त्यांच्याशी मोबाईलवर बोलत आहे. त्यांना आवश्यक औषधाची मदत मिळायला हवी. त्यासाठी सरकारने तत्परता दाखवायला हवी. सरकारला जमत नसल्यास औषधाचा खर्च उचलण्यास आपण तयार आहे, असे सरदेसाई म्हणाले.
धोरणच अंमलात नाही
सरकार विरोधकांना कोविडसंदर्भात विश्वासात घेत नाही. सुरुवातीपासून आम्ही सहकार्य करत आलो आहेत. तरी देखील दोन दिवसांपूर्वी सासष्टीतील मतदारसंघांतील आमदारांची बैठक फक्त सत्ताधारी गटातील तीन आमदारांना घेऊन करण्यात आली. या बैठकीपासून विरोधी आमदारांना दूर ठेवण्यात आले, अशी टीका त्यांनी केली. आरोग्यमंत्री सध्या कोविड इस्पितळात रुग्णांसाठी खाटा शिल्लक नसल्याचे सांगतात. दुसऱया कोविड इस्पितळाबाबत ते आता चर्चा करू लागले आहेत. सरकारचे कोविडबाबत धोरणच अंमलात नसल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका सरदेसाई यांनी याप्रसंगी केली.