संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. 52 मिनिटांच्या या भाषणात राष्ट्रपतींनी सरकारी योजनांचे कौतुक केले. तिहेरी तलाक आणि शेतकऱयांचा उल्लेखही त्यांनी केला. राष्ट्रपती सरकारी योजनांबद्दल बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या बाजूने सभागृहात टाळय़ांचा कडकडाट होताना दिसत होता. मात्र, याचदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘पेगॅसस’वरून घोषणाबाजी करत आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मी देशाच्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो, असे म्हणत राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणाला प्रारंभ केला. तसेच ‘सबका साथ सबका विकास’ या पंतप्रधान मोदींच्या घोषणेचा आधारही ते वारंवार घेताना दिसत होते. कोरोनाकाळात सरकारने राबविलेल्या लसीकरण मोहिमेचे कौतुकही राष्ट्रपतींनी भाषणात केले. माझे सरकार सर्वांच्या सहकार्याने विकासाच्या वाटेवर चालत आहे, असे ते म्हणाले.