मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : राष्ट्रीय पत्रकाररिता दिन साजरा
प्रतिनिधी /पणजी
सरकार व पत्रकारांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसेच सरकारचे चांगले तसेच वाईट देखील लोकापर्यंत पोहोचविले पाहिजे. विरोधक हे निवडणुकांवेळी सरकाराच्या चुका दाखविण्याची वाट पाहतात मात्र पत्रकार आताच्या चुका आताच दाखवून देतात असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिपादन केले. गोव्याचा व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना पत्रकारांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली.
माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कला व संस्कृती खात्याच्या संस्कृती भवन सभागृहात राष्ट्रीय पत्रकारितादिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
पत्रकारांना निवृत्तीनंतर मिळत असलेल्या निवृत्ती वेतनाची रक्कम लवकरच वाढविण्यात येईल. तसेच पत्रकारांना दिल्या जाणाऱया जीवनगौरव पुरस्काराची रक्कम वाढवून देण्यात येणार. याशिवाय पत्रकारांच्या प्रलंबित राहिलेल्या सर्व मागण्या त्वरित मार्गी लावणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर माहिती व प्रसिध्दी सचिव रवी धवन, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रशांत पांजियार, गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक व माहिती प्रसिध्दी खात्याचे संचालक दिपक बांदेकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार गुरूदास सिंगबाळ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार विनायक नाईक, सुधिर सबनीस सायमन आफोंसो, सेगीओ काल्देरा व सुहास बेळेकर यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकारिता हा संविधानातील चौथा स्तंभ मानला जातो. मात्र हे सर्व काही बोलण्यासाठीच आहे. तरूण असताना संसाराला रामराम ठोकत पत्रकारितेत झोकुन दिलेल्या पत्रकाराची म्हातारपणी जी दयनीय अवस्था होते ती पाहिली तर त्याच्या जगण्याला काय दर्जा आहे हा प्रश्न उपस्थित होते. निदान जे पेन्शन मिळते ते तरी त्याला पुरले पाहिजे तेव्हा या सरकारने यावर विचार करण्याची मागणी सत्कारमूर्ती गुरूदास सिंगबाळ यांनी केली.
यावेळी विविध योजना दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवल्या असून माहिती प्रसिध्दा खात्याकडून फाईल्स मंजुर होऊन अर्थ खात्याकडे पाठविल्या जातात मात्र तेथून त्या पुन्हा पाठविण्यात येत असल्याचे राजतिलक नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार व विविध स्पर्धांची बक्षिसे देखील प्रदान करण्यात आली.