हक्कानी नेटवर्क आणि मुल्ला उमरच्या पुत्रामध्ये ‘तू तू -मैं मैं’
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तान जिंकल्याच्या 18 दिवसानंतरही तालिबान आपल्या सरकारची घोषणा करू शकलेला नाही. तालिबानचे नेते गेल्या अनेक दिवसांपासून सरकार स्थापनेच्या नवीन तारखा देत आहेत. दरम्यान, सरकार स्थापनेपूर्वीच तालिबानमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यातील ‘शब्दयुद्ध’ वाढले आहे. हक्कानी नेटवर्कचे नेते अनस हक्कानी आणि खलील हक्कानी हे दोघेही तालिबानचे नेते मुल्ला बरादर आणि मुल्ला याकूब यांच्याशी भिडल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
हक्कानी नेटवर्क सरकार आणि संरक्षणमंत्रिपदामध्ये मोठा हिस्सा देण्याची मागणी करत आहे. मात्र, तालिबानच्या नेत्यांकडून त्यांच्या मागणीला दाद दिली जात नसल्याने संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तालिबानने अद्याप आपल्या सरकारची घोषणा केलेली नाही. एकंदर अंतर्गत परिस्थिती चिघळलेली दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी पाकिस्तानने गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना काबूलला समस्या सोडवण्यासाठी पाठवल्याची माहिती उपलब्ध होत आहे. तालिबानच्या राजकीय नेतृत्वानेही हक्कानी नेटवर्कला सरकारमध्ये काही महत्त्वाची पदे देण्यास सहमती दर्शवली होती. काबूल ताब्यात घेतल्यानंतर लगेचच अनस हक्कानीला राजधानीची सुरक्षा सोपवण्यात आली. मुल्ला याकूब या निर्णयामुळे खूप संतापला आहे.
तालिबान लष्करी आयोगाच्या पदामुळे गोंधळ
दोहामधील तालिबानचे राजकीय कार्यालय आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूबला वजनदार समजल्या जाणाऱया तालिबान लष्करी आयोगाच्या प्रमुखपदाची भूमिका घ्यायची आहे. तालिबान सरकारमध्ये हे पद अत्यंत शक्तिशाली आणि आदरणीय मानले जाते. तालिबानच्या फील्ड कमांडरच्या विशाल नेटवर्कवर देखरेख करणे हे त्याचे मुख्य कर्तव्य समजले जात आहे.
तालिबानकडून ‘तारीख पे तारीख’
अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर तालिबान लवकरात लवकर आपल्या नवीन सरकारची घोषणा करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तालिबानी सेना अफगाणिस्तानच्या भूमीतून अमेरिकन सैन्याच्या पूर्ण माघारीची वाट पाहत होते. 31 ऑगस्ट रोजी अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघारी परतले. त्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने नवीन तारीख देत शुक्रवारी आम्ही आमच्या सरकारची घोषणा करणार आहोत असे जाहीर केले होते. मात्र, शुक्रवारचा दिवस उलटला तरी तालिबानचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.