प्रतिनिधी/ बेळगाव
पिस्तुलीचा धाक दाखवून सराफी दुकानातील दागिने लुटणाऱया एका तरुणाला कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून एक कंट्री पिस्तूल, तीन जीवंत काडतुसे, 4 नेक्लेस आदी जप्त करण्यात आले आहेत.
वैभव राजेंद्र पाटील (वय 29, रा. ज्ञानेश्वरनगर, मजगाव) असे त्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी विजयनगर येथील समृद्धी ज्वेलर्समध्ये पिस्तुलीचा धाक दाखवून दागिने पळविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी वैभवला अटक केली आहे. 27 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वैभवने सराफी दुकानात येवून दागिने दाखविण्यास सांगितले. ट्रेमध्ये ठेवलेले तीन लाख रुपयांचे चार नेक्लेस घेऊन दुकान मालक सचिन बांदिवडेकर याला पिस्तुलीचा धाक दाखवत दागिन्यांसह पलायन केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखली कॅम्पचे पोलीस निरीक्षक बी. संतोषकुमार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. डुग, एस. एम. बांगी, एम. वाय. हुक्केरी, बी. जी. गौडर, हवालदार एम. ए. पाटील, जी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, ए. बी. घट्टद, यु. एम. थैकार, एस. एस. तळवार आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त सीमा लाटकर, यशोदा वंटगोडी यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.