वृत्तसंस्था/ सिडनी
रविवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या तीन दिवसांच्या सरावाच्या क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध खेळताना भारत अ संघाने दिवसअखेर पहिल्या डावात 8 बाद 237 धावा जमविल्या. अजिंक्य रहाणेने शानदार शतक (108) तर चेतेश्वर पुजाराने अर्धशतक (54) झळकविले.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीचा हा पहिला सरावाचा सामना खेळविला जात आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांना फलंदाजीचा सूर मिळणे जरूरीचे आहे. या सामन्यात भारत अ च्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सलामीच्या जोडीसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी चुरस निर्माण झालेल्या शुभम गिल आणि पृथ्वी शॉ यांना मात्र या सामन्यात आपले खाते उघडता आले नाही. हॅरीसच्या गोलंदाजीवर गिल पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये झेलबाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉ पुढील षटकांत पेनीकरवी झेलबाद झाला. त्यालाही आपले खाते उघडता आले नाही. तिसऱया षटकांत भारत अ ची स्थिती 2 बाद 6 अशी केविलवाणी होती. तब्बल 9 महिन्यानंतर पहिल्याच सामन्यात खेळणारा हनुमा विहारी बर्डच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 15 धावा जमविल्या. अनुभवी रहाणे आणि पुजारा यांनी संघाचा डाव सावरला. रहाणेने 228 चेंडूत 108 धावा झळकविल्या. पुजारा 47 व्या षटकांत बाद झाला. त्याने 140 चेंडूत थ्54 धावा जमविल्या. यष्टीरक्षक साहालाही आपले खाते उघडता आले नाही. रविचंद्रन अश्विन 5 धावांवर तंबूत परतला. चहापानावेळी भारत अ ची स्थिती 6 बाद 128 अशी होती. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर रहाणेने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने पॅटीनसनला षटकार खेचला. हेडने कुलदीप यादवला बाद केले. रहाणे 108 धावांवर दिवसअखेर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलिया अतर्फे पॅटीनसनने 3 गडी तर मिचेल निसेरने दोन आणि बर्डने एक गडी बाद केला. कर्णधार हेडने 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
भारत अ डाव- 8 बाद 237 (रहाणे खेळत आहे 108, पुजारा 54, विहारी 15, अश्विन 5, कुलदीप यादव 15, पॅटीनसन 3 बळी, निसर 2-51, हेड 2 बळी, बर्ड 1-34)