जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड स्वतःचे सर्वोत्तम राहणीमान, सुखसुविधा आणि व्यवस्थेसाठी ओळखला जातो. या देशात आनंदी नसलेला व्यक्ती एकही नसेल असे म्हटले जाते. पण सर्वात आनंदी देश फिनलंड एका गोष्टीवरून चिंतेत पडला आहे. वृद्ध होत चाललेल्या लोकसंख्येमुळे फिनलंड मनुष्यबळाच्या टंचाईला तोंड देत आहे. तेथे काम करण्यासाठी लोकच मिळेनासे झाले आहेत. अशा स्थितीत अन्य देशांमधील लोकांनी येथे स्थायिक व्हावे अशी फिनलंडची इच्छा आहे.
देशात मोठय़ा संख्येत लोकांची गरज असल्याचे आता व्यापक स्वरुपात मान्य करण्यात आले आहे. वृद्ध होत चाललेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर युवा लोकांची गरज असल्याचे म्हटले गेले आहे. फिनंलडच्या उलट पाश्चिमात्य देश लोकसंख्या वृद्धीला तोंड देत आहेत.
फिनलंडमध्ये 100 कार्यगटातील लोकांमध्ये 39.2 टक्के लोक 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. वृद्ध लोकसंख्येत फिनलंड जपाननंतर दुसऱया स्थानावर आहे. 55.2 लाख लोकसंख्या असलेल्या देशाला सार्वजनिक सेवा कायम राखणे आणि वाढती पेन्शन तूट कमी करण्यासाठी दरवर्षी 20000-30000 विदेशींना स्वीकारावे लागणार असल्याचा इशारा सरकारने दिला आहे.
फिनलंडनमध्ये स्थलांतरित होण्यास अन्य देशातील लोक फारसे इच्छुक नसतात. यामागे अनेक राजकीय तसेच सामाजिक अडचणी असल्याचे समजते. बिगरफिनिश अर्जदारांबद्दल भेदभावाची तक्रार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला फिनंलडमध्ये वास्तव्याची मंजुरी मिळाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीला मंजुरी नाकारली जाते.