दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांची माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
‘लव्ह बेकअप’ झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या सर्वेश गावकर (22 वर्षे) याने अनिशा वेळीप (18 वर्षे) हिचा खेडे-पाडी येथे ओहोळय़ातील पाण्यात बुडवून खून केल्याच्या निष्कर्शापर्यंत पोलीस आले असून मयत सर्वेशच्या विरोधात कुंकळळी पोलीस स्थानकावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली आहे.
रविवारी अनिशा वेळीप ही कपडे धुण्यासाठी ओहोळावर गेली असता तिला सर्वेशने पाण्यात बुडवून मारले. त्यानंतर स्वतःही कावरे-पिर्ला येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकाराने खेडे-पाडी व कावरे-पिर्ला हे गाव पूर्णपणे हादरून गेले आहेत. रविवारी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरापर्यंत तपास काम जारी होते. सोमवारी अनिशा व सर्वेशच्या मृतदेहाची हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सा करण्यात आली. त्यात अनिशाला जबरदस्तीने पाण्यात बुडवून मारल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सर्वेशच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला.
खून केल्यानंतर सर्वेश पळून गेला
अनिशाला पाण्यात जबरदस्तीने बुडवून मारल्यानंतर सर्वेश घटनास्थळावरून पळून गेला. जेव्हा, त्याचा पोलीस शोध घेऊ लागले, तेव्हा त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. रविवारी अनिशा जेव्हा ओहोळावर कपडे धुण्यासाठी गेली होती, त्यावेळी सर्वेशला अनिशाच्या आईने तसेच अन्य दोन-तीन व्यक्तींनी पाहिले होते. पण, सर्वेश अनिशाला भेटायला अनेक वेळा या ठिकाणी यायचा, त्यामुळे त्यांच्याकडे कुणी गांभीर्याने पाहिले नाही. ‘लव्ह ब्रेकअप’ झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या सर्वेशने तिला जबरदस्तीने पाण्यात बुडवून जीवंत मारले.
सर्वेश व अनिशाचे प्रेम प्रकरण दोन वर्षापासून सुरू होते. त्यानंतर त्याच्यात का बेकअप झाला आणि ही घटना का घडली याचा पोलीस तपास करणार असल्याची माहिती देण्यात आली.
सर्वेशने खून करण्याची कल्पना आईला दिली होती?
अनिशाकडे ब्रेकअप झाल्यानंतर सर्वेश वैफल्यग्रस्त झाला होता. आपण अनिशाचा खून करणार असल्याची कल्पना त्याने आपल्या आईला गेल्या काही दिवसामागे दिली होती अशी माहिती आता समोर आली आहे. रविवारी अनिशाला पाण्यात बुडवून मारल्यानतंर सर्वेशने सरळ आपले घर गाठले. घरी गेल्यावर अंगावरील कपडे काढून ते आईला धुण्यास सांगितले. दुसरे कपडे घालून घरातून बाहेर पडला. आपल्या कावरे गावातील एका बारमधून त्याने दोन दारूच्या बाटल्या खरेदी केल्या व त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती उलपब्ध झाली आहे.
सर्वेश व अनिशाचे प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर त्यांच्या सातत्याने गाठीभेटी व्हायच्या. या भेटीचे फोटो सर्वेशने आपल्या फेसबुक खात्यावर टाकलेले आहेत. त्यात अनिशा अधुनमधून सर्वेशच्या घरी जायची तर सर्वेश अनिशाच्या घरी यायचा. मात्र, गेल्या एक महिन्यापूर्वी लव्ह ब्रेकअप झाल्यानंतर सर्वेश सुडाने पेटून उठला होता. त्याने अनिशाला आपणाला सोडून अन्य दुसऱया कुणाशी लग्न कसे काय करते हे पाहून घेऊ अशी धमकी सुद्धा दिली होती.
अनिशाने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तर सर्वेशचे केवळ आठवीपर्यंत शिक्षण झालेले असून तो सांगे येथील पेप्सी कंपनीत वाहनावर लोडर म्हणून काम करीत होता. त्याचा मोठा भाऊ देखील याच कंपनीत लोडर म्हणून काम करीत आहे. सर्वेशला आई व भाऊ असा परिवार आहे. अनिशाला आई-वडिल तसेच एक भाऊ असा परिवार आहे. अनिशाचे तीन काका हे पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. अनिशाचे कुटूंब हे सुसंस्कृत आहे. याच्या उलट सर्वेशची परिस्थिती. दोघांच्या प्रेम प्रकरणाची कल्पना अनिशाच्या घरी कळली, त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची माहिती उलपब्ध झाली आहे.