लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचा संघ आपले सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध असतील तरच ऍशेस क्रिकेट मालिका खेळण्यासाठी डिसेंबर-जानेवारीत ऑस्ट्रेलिया दौऱयावर जातील, असे सोमवारी ईसीबीने म्हटले. ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे अनेक निर्बंध असून त्या पार्श्वभूमीवर देखील वेगळा विचार करावा लागू शकतो, असे ईसीबीचे मत आहे.
‘सध्या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये याबाबत सकारात्मक विचार सुरु आहे. क्वारन्टाईन नियोजन कसे असेल व खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना समवेत आणता येईल का, याबाबत चित्र स्पष्ट होणे बाकी आहे’, असे ईसीबीने यावेळी जाहीर केले. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होत असून पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ऍशेस मालिका दि. 8 डिसेंबरपासून जानेवारीच्या मध्यापर्यंत खेळवली जाणार आहे.
तूर्तास, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स अनिश्चित कालावधीकरिता ब्रेकवर आहे. शिवाय, कर्णधार जो रुटने ऍशेस सहभागाविषयी काहीही कळवलेले नाही. जो रुट उपलब्ध असेल किंवा नसेल तरी ऍशेस वेळापत्रकानुसारच होईल, असा दावा टीम पेनने केला होता. पण, त्यात फारसे तथ्य नसल्याचे आता ईसीबीच्या या स्पष्टीकरणामुळे निदर्शनास आले आहे.
कोरोनाच्या महाप्रलयामुळे इंग्लंडने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बरेच फेरबदल केले आहेत. इंग्लिश संघ 2020 मध्ये श्रीलंका व दक्षिण आफ्रिका दौऱयावरुन लवकर परत आला होता. शिवाय, अलीकडेच भारताने पाचवा कसोटी सामना खेळण्यास असमर्थता दर्शवल्याने ती कसोटी रद्दबातल ठरवली गेली. इंग्लंडने याशिवाय, या महिन्यात टी-20 विश्वचषकापूर्वी आयोजित बांगलादेश व पाकिस्तानचे दौरे देखील रद्द केले आहेत.