जागतिक पातळीवरील मिळताजुळता कल – सेन्सेक्स 102 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजार घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये मागील चार सत्रात सेन्सेक्स नुकसानीत राहिला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये प्रमुख कंपन्यांपैकी आयटीसी, मारुती सुझुकी आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील मिळता जुळता कल राहिल्याने याचा परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
बाजारात काही कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 101.88 अंकांनी प्रभावीत होत 0.17 टक्क्यांनी घसरत 60,821.62 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 63.20 अंकांनी प्रभावीत होत 035 टक्क्यांच्या घसरणीसह 18,114.90 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील आयटीसीचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच मारुती सुझुकी, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि टाटा स्टीलचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला एचडीएफसी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, कोटक बँक, टायटन आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मात्र तेजीसोबत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील घडामोडींमधील आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि चीनचा शांघाय कम्पोझिट नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्की हे तेजीसोबत बंद झाले आहेत. शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून गुंतवणूकदारांनी 2,818.90 कोटी रुपये किमतीच्या समभागांची विक्री केली असल्याची माहिती आहे. यासह आंतरराष्ट्रीय ब्रेंट कच्चे तेल 0.52 टक्क्यांनी वधारत 85.05 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.