कणकवलीतील स्थिती : बँका बंद असल्याने गर्दीत वाढ
वार्ताहर / कणकवली:
शुक्रवार ते रविवारपर्यंत सलग तीन दिवस आलेल्या सुट्टीमुळे सोमवारी सकाळी शहरातील बँकांसमोर खातेदारांनी गर्दी केली होती. गेले तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने लोकांना पैसे काढणे किंवा पैसे भरणा करणे आदी कामांसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, सोमवारी एक दिवस बँक सुरू राहणार असून मंगळवारी बँकेला सुट्टी असल्याने अनेक खातेदारांनी बँकांसमोर रांगा लावल्या होता.
शुक्रवारी, 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे, 11 रोजी दुसरा शनिवार व 12 रोजी रविवार आल्याने तीन दिवस बँका बंद होत्या. त्यातच सोमवारी एकच दिवस बँक सुरू राहिल्यानंतर मंगळवारी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे बँकांना सुट्टी असल्याने सोमवारी शहरातील अनेक बँकांसमोर खातेदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. स्टेट बँकेसमोर तर लागलेली रांग सकाळी महामार्गाच्या बँकेसमोरील पिलरजवळ आली होती. बँक ऑफ इंडियाच्या समोरही मोठी रांग होती. बँक ऑफ महाराष्ट्रासमोर खातेदारांनी सोशल डिस्टंन्सिग पाळत रांग लावली होती. सारस्वत बँकेसमोरही खातेदारांची रांग लागली होती.