मडगाव : हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी जमशेदपूर एफसी आणि बेंगलोर एफसी यांच्यात लढत होत आहे. बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या तरीही मोसमाची विजयी सांगता करण्याचे त्यांचे लक्ष असेल. कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे दोन्ही संघांची मोहीम अपयशी ठरली. आज वास्कोच्या टिळक मैदानावर हा सामना होईल.
ओवेन कॉयल यांच्या जमशेदपूरचा सध्या सहावा क्रमांक आहे. बेंगलोरपेक्षा त्यांचे दोन गुण जास्त आहेत. बरोबरी झाली तर त्यांचा सहावा क्रमांक कायम राहील. हेच त्यांना हरवल्यास हे स्थान बेंगलोरला मिळेल. पहिल्या लढतीत जमशेदपूर विजयी ठरला होता. तेव्हा स्टीफन इझे याचा गोल निर्णायक ठरला होता. मागील लढतीत जमशेदपूरने मुंबई सिटीच्या साखळीमधील अव्वल क्रमांकाच्या आशाना 2-0 अशा विजयासह धक्का दिला.
मुंबई एफसीविरूद्ध केलेल्या कामगिरीची आम्हाला पुनरावृत्ती करायची आहे. आम्ही बाद फेरीच्या स्थानापासून अगदी जवळ आलो होतो. त्यामुळे आम्हाला सांगता भक्कम करायची आहे, असे कॉयल म्हणाले. विजयासाठी आम्हाला फार चांगला खेळ करावा लागेल आणि तीन गुण जिंकण्याचे प्रयत्न करावे लागतील. बेंगलोरला अजुनही एएफसी करंडक सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष खेळावर केंद्रीत असेल. आम्हाला आव्हानाला सामोर जाण्यास सज्ज राहावे लागेल.
बेंगलोरचा संघ आयएसएल फुटबॉल स्पर्धेत प्रथमच बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. मोसमाच्या मध्येच कार्लेस कुआद्रात यांना क्लबने डच्चू दिल्यानंतर त्यांचे आव्हान कमकुवत बनले. त्यानंतर विजय फार मिळाले नसले तरी हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी संघाने अखेरपर्यंत झुंज दिल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केलीसातत्य राहिले नसले तरी आम्ही सतत सकारात्मक राहिलो. आमच्याकडे जी काही ताकद होती, ती पणास लावून बाद फेरी गाठू शकू का, हय़ासाठी प्रयत्न करीत राहिलो. आम्ही सतत सर्वोत्तम प्रयत्न करत होतो, असे मुसा म्हणाले. या सामन्यात बेंगलोरचे बिश्वा दोर्जी आणि आशिक कुरुनियन खेळू शकणार नाहीत.