सांगरुळ / वार्ताहर
‘शहीद मेजर सुभेदार मारुती साळोखे अमर रहे’च्या घोषणा देत अत्यंत शोकाकुल वातावरणात करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील जवान मारुती साळोखे यांच्यावर रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगरुळ सह परिसरातील गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. टी ए बटालियनच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून सुभेदार साळोखे यांना मानवंदना दिली.
सुभेदार मारुती साळोखे यांचा शनिवारी सकाळी सराव सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुणे येथून रविवारी सायंकाळी सांगरुळ गावात आणले. आपल्या गावातील जवानाचा मृत्यू झाल्याने सारे गाव हळहळले. यावेळी शहिद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पी एन पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, सरपंच सदाशिव खाडे यांनी जवान साळोखे यांना श्रद्धांजली वाहिली.
सांगरुळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मारुती यांना सैन्यात जाण्याची इच्छा होती. दहावी नंतर त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय सेनेमध्ये भरती झाले. शिपाई पदापासून मेजर सुभेदार या वरिष्ठ पदापर्यंत अभूतपूर्व झेप घेत त्यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांचं प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर सांगरूळ येथे तर माध्यमिक शिक्षण सांगरुळ हायस्कुल येथे पार पडले. दहावी नंतर ते भारतीय सैन्यात भरती झाले. २७ जून १९९१ रोजी इंजिनिअर बी ई जी सेंटर पुणे येथे देशसेवेत रुजू झाले. पुणे, चंदिगड,जम्मू काश्मीर, आसाम,राजस्थान, अंबाला आदी ठिकाणी २९ वर्षे ४ महिने एवढी देशाची प्रदीर्घ सेवा केली. आठ महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते. खडकी पुणे येथे अखेरची सेवा बजावत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी सरावादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी त्यांच पार्थिव मूळगावी सांगरुळ येथे आणण्यात आले. अंत्ययात्रेची तयारी सांगरुळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
यावेळी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून गावातील मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. टी ए बटालियनच्या जवानांनी फैरी झाडून सलामी दिली. शासकीय ईतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डेपो बटालियनचे सुभेदार संजय पाटील, बी जी भोसले, प्रकाश पाटील, कोल्हापूर जिल्हासैनिकी कार्यालयचे चंद्रशेखर पांगे, सेवनिवृत्त कॅप्टन चंद्रकांत पाटील, तहसीलदार शीतल मुळे भामरे, गोकुळचे संचालक बाळासो खाडे, सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव जयंत आसगावकर, सभापती अश्विनी धोत्रे, कुंभी कारखान्याचे व्हा चेअरमन निवास वातकर, सु पो सदस्य साभाष सातपुते, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, पं स सदस्या अर्चना खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, करवीर उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, सर्कल सुहास घोदे, पोलीस पाटील बाजीराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.