रुग्णालये तात्काळ सक्रिय करा- जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / सांगली
सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट सुरु असून शासनस्तरावर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्हा ग्रामीण क्षेत्रातसुध्दा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरु आहे. सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी जिल्ह्यातील जी रुग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्टेशन ॲक्ट 1949 (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत आहेत. अशी खासगी रुग्णालये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्काळ आरक्षित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
सांगली जिल्ह्यातील श्वास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कडेपूर ता-कडेगाव, श्री. सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व आय.सी.यु सेंटर आटपाडी, सुश्रुषा हॉस्पिटल, इस्लामपूर ता- वाळवा, ओमश्री हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, विटा ता- खानापूर, आष्टा क्रिटीकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आष्टा ता- वाळवा, श्री हॉस्पिटल विटा, ता- खानापूर, लाईफकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कैलास सेंटर विटा रोड, तासगाव, कवठेमहाकांळ कोविड हेल्थ सेटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कवठेमहाकाळ, जत कोविड सेंटर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा जत ही कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी आय.सी.यु व आयसोलेशन वार्ड त्वरित कार्यविन्त करण्यात यावेत. रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या उपचार प्रणालींच्या मार्गदर्शन सुचनांच्या अधिन राहुन उपचार करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन अथवा कामात हलगर्जी किंवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम, अंतर्गत कायद्येशिर कारवाई करण्यात येईल. तसेच आरक्षित करण्यात आलेल्या रुग्णालयांच्या ठिकाणच्या आस्थापनेवरील कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी कामात कसुर केल्यास त्यांच्याविरुध्द ही विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी स्पष्ट केले आहे.