प्रतिनिधी / नागठाणे :
महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, दिवसेंदिवस रूग्ण संख्येत वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी शासनाने नुकतेच कडक निर्बंध जाहीर केले असून, त्याच अनुषंगाने नागठाणे (ता.सातारा) येथील आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली.
नागठाणे हे परिसरातील बाजारपेठेचं मोठं गावं असून, परिसरातील 50 हुन अधिक गावांचा या गावाशी रोजचा संपर्क आहे. प्रत्येक आठवड्यातील मंगळवारी येथे सर्वप्रकारच्या भाजीपाल्यासोबत जीवनावश्यक वस्तूंचा बाजार भरतो. त्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच गावातील नागरिक बाजारासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन हवालदिल झाले आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातूनही कोरोनाच्या रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने सापडू लागले आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध जाहीर केले. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत नागठाणे येथील आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे.
इतर दिवशीही गावामध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नियमानुसार मास्क, तसेच सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. नियमांचे पालन न केल्यास संबधीत व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच बेंद्रे व उपसरपंच साळुंखे यांनी सांगितले.