स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड.संदे यांचा इशारा : राष्ट्रवादी एका आमदारांची मिलीभगत : चौकशी समितीवर दबाव
प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील डॉ. सचिन सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू झाले. याबाबत सर्व पक्षीय पदाधिकारी व सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती कारवाई करण्यात वेळकाढूपणा करीत असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व एका विरोधी पक्षाचे एक आमदार यांची मिलीभगत आहे. या हॉस्पिटलवर कारवाई न झाल्यास यापुढे कोरोना रुग्ण प्रशासकीय कार्यालयात आणून दाखल केले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ऍड. एस. यु. संदे यांनी निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनात म्हटले आहे की, दि.२ मे २०२१ रोजी सांगरुळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटलमध्ये सहा कोरोनाग्रस्त रुग्णांचा डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला. याबाबत स्थानिक प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे कांही सामाजिक संघटना व सर्व पक्षीय कृतीसमितीने दुर्घटनेबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांना निवेदन देऊन याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यास अनुसरून जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. तथापी चौकशी समिती राजकीय दबावामुळे वरील प्रकरणाची सखोल चौकशी करत नाही. चौकशीचा अहवाल सादर करत नाही व कोणतीही कारवाई ही करत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
सांगली येथील कोविड सेंटरच्या तक्रारीनंतर केवळ चार तासांच्या आत ते बंद करण्यात आले. पण डॉ.सांगरुळकर यांना कोण पाठीशी घालत आहेत हे ही लोकांना कळत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षाचा एक आमदार यांची मिलीभगत असून विरोधी पक्षाच्या आमदाराची त्या हॉस्पिटलमध्ये भागीदारी असल्यामुळे या प्रकरणात चौकशी समितीवर दबाव असल्याचा संशय आहे.
‘वाघा घरी शेळी पाहुणी’
प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत त्यांनी त्यांचे काम जनताभिमुख करावे. त्यांनी राजकीय दबाव झुगारून देवून हे हॉस्पिटल व कोविड सेंटरबाबत सत्य जनतेसमोर आणावे. आजही ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल होत असून त्यांची अवस्था ‘वाघा घरी शेळी पाहुणी’ अशी होत आहे. तरी प्रशासनाने वरील कोविड सेंटर बाबत सत्वर निर्णय घेतला नाही तर यापुढे कोरोना रुग्ण प्रशासकीय कार्यालयात आणून दाखल केले जातील.