प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील मिरज हायस्कुल रोड येथे अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदाराने चक्क नवीन रस्ता जेसीबी लावून उखडला. रस्ता करण्याआधी पाईपलाईन टाकायची राहून गेल्याचे स्पष्टीकरण देऊन हा रस्ता खोदण्यात आला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रत्यय आला. वारंवार रस्ते खुदाई करून जनेतच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कोट्यावधी रुपयांच्या रस्ते कामाचा धुमधडका सुरू आहे. अमृत योजना अंतिम टप्प्यात आल्याने विविध प्रभागात संपूर्ण रस्ते नव्याने करण्यात येत आहेत. मिरज हायस्कुल रस्त्यावरही यापूर्वी अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकण्यात आल्या होत्या. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. डांबर ओतून खडीकरणही झाले होते. दोन दिवसात हॉटमिक्स केले जाणार होते.
मात्र, बुधवारी सकाळी अमृत योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी पुन्हा रस्ता जेसीबी लावून खोदण्यात आला. नवीन रस्त्यावर खुदाई केल्याचा जाब विचारल्यानंतर एक पाईप टाकायची राहिले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. दरम्यान, वारंवार रस्ते खुदाई करून महापालिकेचे कारभारी आणि ठेकेदार पैशांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.