शाहूपुरी : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर शासनाने बंदी घातली असली तरी, साताऱ्यात मात्र याउलट चित्र नजरेस पडत आहे. सातारा नगर पालिकेत तसेच शहरातील प्रमुख चौक, पान टपऱ्या, तसेच चहाच्या गाड्यांवर बिडी व सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
प्रशासनाकडून कारवाईच होत नसल्याने धूम्रपान करणाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. असे असले तरी सिगारेट, बिडी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शौकिनांना जिल्ह्यात काही कमी नाही. साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक येथील टपऱ्या, चहा व वडापावचे गाडे आदी ठिकाणी सिगारेट, बिडी खुलेआम ओढली जाते.
सिगारेटचे दुष्परिणाम व त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. मात्र, धूम्रपानकरणाऱ्यांकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्याही सर्वाधिक असून, ही चिंतेची बाब आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.