शवविच्छेदनानंतर खून प्रकरणाचा उलडगा, दोघांना अटक
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील बेडग येथील सुलाबाई आनंदा पाटील (वय 68) या वृध्देच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणाचा 24 तासात उलगडा झाला. सदर वृध्देचा गळा दाबून खून केला असल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन सदर वृध्देच्या नात्यातील दोघांना अटक केली आहे. शेत जमीनीच्या वादातून सदर खून झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
वृध्देच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दादासो अगणु पाटील (वय 50) आणि त्याचा मुलगा सौरभ दादासो पाटील (वय 28, दोघे रा. बेडग) या बाप-लेकाचा समावेश आहे. सदर दोघे हे मयत सुलाबाई पाटील यांचे नातेवाईक असून, दोघांनी शेतजमिनीच्या सामायिक रस्त्याच्या वादातून सुलाबाई पाटील यांचा गळा दाबून खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.