मिरजेत महिला व नागरिक आक्रमक, वर्षभरापासून ड्रेनेजची समस्या
मिरज / प्रतिनिधी
मिरजेतील नदीवेस परिसरात मागील वर्षभरापासून ड्रेनेजचे दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावर ड्रेनेजच्या पाण्याचे तळे साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात डेंग्यूसदृश्य आजाराचा फैलाव झाला असून, अनेक रहिवासी आजारी आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयावर धडक दिली.
येथून सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पाहणी करण्यात आली. यावेळी संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना येथील रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या दूषित पाण्यातून पायी चालत फिरवले. या भागात पाणी निचरा होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाईप लाईन टाकून देण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना दिले आहे. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा येथील संतप्त महिला व नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिला.