प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील फुले कॉलनी येथे सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून रविवारी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी एक लाख 80 हजारांच्या गुटख्यासह 3 लाख, 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अलताफ मुलाणी (वय 53, रा. शामराव नगर सांगली) याला ताब्यात घेण्यात आली आहे.
कोल्हापूर रस्त्यावरून महात्मा फुले कॉलनी येथे शनिवारी दुपारी (एमएच-10-सीक्यू-1259) या तीन चाकी टेम्पोतून गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे हवालदार बाळासाहेब निळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून तीन चाकी टेम्पो पकडला.
या टेम्पोची झडती घेतली असता सुगंधी तंबाखूची दहा पोटी आणि पवन गुटख्याच्या पुड्या असा एक लाख, 80 हजार रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी सदर गुटखा आणि टेम्पो असा तीन लाख, 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अलताफ मुलाणी याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदरचा गुटखा हा उगार मधून आला असून, मिरजेत तो कोणाकडे पाठविला जाणार होता ? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.