घरपट्टी व भाडेपट्टीच्या विषयांचे पडसाद उमटण्याची शक्यता, उमेदवारांमध्ये जास्त युवा व नवीन चेहरे, बऱयाच जुन्या चेहऱयांना निवडणूक जड जाण्याचे संकेत
प्रतिनिधी / सांगे
यंदाची सांगे नगरपालिका निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘क’ दर्जाच्या या नगरपालिकेचे दहा प्रभाग आहेत. मावळत्या पालिका मंडळाच्या कारकिर्दीत एकीकडे भरमसाठ वाढविण्यात आलेल्या घरपट्टीचा विषय, तर दुसरीकडे सांगे बाजारातील दुकानदारांचा भिजत राहिलेला भाडेपट्टीचा विषय यामुळे दुकानदार आणि अन्य नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. दुकानदारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आशेचा किरण दाखविला आहे. मात्र नूतन पालिका मंडळाला हा विषय जाग्यावर घालावा लागणार आहे.
शेजारच्या काकोडा-कुडचडे पालिका क्षेत्रातील घरपट्टी कमी आहे. मग सांगेतच इतकी भरमसाठ वाढविण्याची गरज काय, असा सवाल सांगेतील नागरिक करत आहेत. लोकांच्या मनात हा राग कायम असून उघडपणे ते बोलून दाखवत आहेत. दुसरीकडे, पालिकेच्या बाजार संकुलात पालिकेची 200 च्या आसपास दुकाने आहेत. गेल्या वीस वर्षांचा हा विषय असून पालिकेच्या चुकीमुळे भरमसाठ भाडय़ाची रक्कम भरणे दुकानदारांना कठीण होऊन बसले आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात पालिका उपसंचालकांनी पालिका मुख्याधिकाऱयांना पत्र पाठवून सरकारने दुकानदारांची पन्नास टक्के थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव स्वीकारला नसल्याचे कळविले होते. त्यावर व्यापारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करून या निर्णयाचा निषेध म्हणून सांगे बाजारपेठ बंद ठेवली होती.
त्यानंतर या दुकानदारांशी तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयांशी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी संपर्क साधून मध्यस्थी करून मडगाव येथे मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली होती. मुख्यमंत्र्यांकडील भेटीत तोडगा निघाल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले होते. त्यासाठी नव्या पालिका मंडळाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जुन्या पालिका मंडळावर दुकानदारांचा राग स्पष्टपणे दिसत आहे.
विविध समस्या कायम
सांगे येथील जुन्या टाऊन हॉलची वास्तू मोडण्यासाठी निविदा काढूनही मावळत्या पालिका मंडळाला कृती करणे शक्मय झाले नाही. मात्र पालिका मंडळाने सरतेशेवटी गेस्ट हाऊसचे उद्घाटन करून घेतले व आपल्या नावाची पाटी लावली. मार्केट संकुलाच्या दुसऱया टप्प्याचे काम काही सुरू होऊ शकले नाही. सांगे बसस्थानक व बेशिस्त पार्किंग, हिंदू स्मशानभूमीचे काम, हायमास्ट व न पेटणारे फोकस दिवे या समस्या कायम आहेत.
सध्या मावळत्या पालिका मंडळातील संजय (आबुली) रायकर, रूमाल्डो फर्नांडिस, रोजमारिया फर्नांडिस, संदेश कोसंबे, कॅरोज प्रुज व फौझिया शेख निवडणुकीत उतरल्या आहेत. यंदा उमेदवारांमध्ये जास्त युवा व नवे चेहरे आहेत. बऱयाच जुन्या चेहऱयांना ही निवडणूक जड जाईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. पुन्हा पुन्हा तेच का, असा सवाल मतदार करताना दिसत आहेत.
एकही पॅनल नाही
विद्यमान आमदार प्रसाद गावकर यांच्यासह भाजप व अन्य कोणत्याही पक्षाचे किंवा बिगरपक्षीय पॅनल जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र भाजपने आपले उमेदवार सर्व प्रभागांत उभे केले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी माजी आमदार फळदेसाई यांच्या टीमने कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीवेळी फळदेसाई हे सांगे मतदारसंघाचे आमदार होते. त्यावेळी पालिका निवडणुकीत भाजपने आपले पॅनल उतरविले होते. तसेच जाहीरनामाही प्रकाशित केला होता. मात्र यावेळी पॅनल जाहीर न करता उमेदवार उभे केले आहेत. सांगे पालिका क्षेत्रात भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नरेंद्र सावईकर हे काम पाहत आहेत. निवडणुकीत आमदार गावकर यांचा खुला दबदबा दिसून येत नाही.
फौझिया विरुद्ध संजय
सर्वाधिक मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या प्रभाग 6 मधील मावळत्या नगरसेविका फौझिया शेख या प्रभाग राखीवतेच्या विरोधात न्यायालयात गेल्या होत्या. तेथे त्यांना न्याय मिळाला. पूर्वी हा प्रभाग ओबीसींकरिता राखीव करण्यात आला होता. नंतर तो खुला करण्यात आला. येथे तिरंगी लढत अपेक्षित असून सतत सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले संजय (आबुली) रायकर निवडणुकीत उभे आहेत. न्यायालयाने फौझिया यांना न्याय दिला, आता मतदार कोणाला न्याय देतात हे पाहावे लागणार आहे. लोकांच्या आग्रहास्तव आपण न्यायालयात गेले आणि आता त्यांनी सांगितल्यामुळे आपण निवडणुकीत उतरले असल्याचे शेख यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे येथील लढतीकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
या निवडणुकीत महिलांचा कमालीचा उत्साह दिसून येत आहे. प्रथमच राखीवतेमुळे अनुसूचित जातींतील एका महिलेला नगरसेविका बनता येणार आहे. माजी नगराध्यक्ष रूमाल्डो फर्नांडिस प्रभाग 1 मधून निवडणूक लढवत आहेत. न्यायपालिकेच्या निवाडय़ामुळे त्यांना जीवदान मिळाले. न्यायालयाच्या निकालानंतर हा प्रभाग ओबीसींकरिता राखीव झाला. जनता नेमकी कुणाच्या बाजूने आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 5 व 10 मध्ये बहुरंगी लढत व कमालीची चुरस आहे. प्रभाग 2 मध्ये दोन माजी नगरसेवकांना नव्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. एकूणच निवडणुकीत रंग भरत आहे.