प्रतिनिधी / सांगे
सांगे येथे प्रथमच दोन दिवशीय अखिल गोवा पुरुष आणि महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 2021-22 चे आयोजन गोवा पॉवरलिफ्टिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगे येथील दत्तवाडी बॉईज यांनी केले आहे. शनिवार 6 व रविवार 7 रोजी सांगे सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी सांगे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
यावेळी पॉवरलिफ्ंिटग असोसिएशनचे संजय रायकर तसेच दत्तवाडी बॉईजचे ऍड. अभिनव मराठे यांनी सविस्तर कार्यक्रम विषद केला.
पुरुषांसाठी रोख 8000, 6000 व 4000 तसेच पदके, तर महिलांसाठी 7000, 4000 व 3000 व पदके अशी बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती मराठे यांनी दिली. स्ट्राँगमॅन व स्ट्राँगवुमनसाठी प्रत्येकी रोख 5000 चे खास बक्षीस व चषक दिला जाणार आहे. याशिवाय इतर अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सुमारे 90 हून जास्त स्पर्धक सहभागी होणार असून पॉवरलिफ्ंिटग असोसिएशनची सूत्रे हाती घेतल्यापासून अध्यक्ष चिराग नाईक यांनी चांगले कार्य केले आहे. पॉवरलिफ्टिंगला प्रोत्साहन देण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे, असे रायकर यांनी सांगितले.
आज शनिवार 6 रोजी सकाळी 10 वा. वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, समाजसेविका सावित्री कवळेकर, अध्यक्ष चिराग नाईक हजर राहणार आहेत. समारोप कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार प्रसाद गावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई, समाजसेविका सावित्री कवळेकर, पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष चिराग नाईक हजर राहणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पॉवरलिफ्टर अल ब्रागांझा, प्रथम एनआयएस प्रशिक्षक (वेटलिफ्टिंग, गोवा) श्याम सावर्डेकर तसेच सांगे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला दत्तवाडी बॉईजचे प्रमेय करमळकर, सायदीप गोवेकर, सिद्धेश रायकर, पूर्णय रायकर व नारायण मसूरकर हजर होते.