क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी ओडिशा एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्या लढत होईल. हा सामना बांबोळीच्या जीएमसी स्टेडियमवर होईल. ओडिशा एफसीचा संघ अकरा संघांमध्ये 14 सामन्यांतून केवळ आठ गुणांसह तळाला आहे. संपूर्ण मोसमात त्यांना संघर्ष करावा लागला आहे. त्यांना एकच सामना जिंकता आला असून याशिवाय त्यांच्याविरुद्ध 21 गोल झाले आहेत.
पाच सामन्यांत ओडिशाने बरोबरी साधली असून आठ सामने गमविले आहेत. ओडिशाच्या आघाडीफळीला सफाईदार कामगिरी करता आलेली नाही. सेल्फ गोल वगळता त्यांना केवळ अकरा गोल करता आले आहेत. 27 गुणांनी दुसऱया स्थानावर असलेल्या एटीके मोहन बागानने 14 सामन्यांतून आठ विजय नोंदविले असून तीन सामने अनिर्णीत ठेवले आणि तीन गमविले आहेत.
मागील पाच सामन्यांत ओडिशा एफसीला विजय मिळालेला नाही. अशावेळी एटीके मोहन बागानविरुद्ध विजय मिळाला नाही तर त्यांच्या बाद फेरीच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात येतील याची ओदिशाला कल्पना आहे. ओडिशाने मुख्य प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्सटर यांना निरोप दिला असून जेराल्ड पेटन यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अखेरच्या सहा सामन्यात आम्ही सकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करू, असे पेटन म्हणाले.
आम्ही जिद्दिने अधिकाधिक सामने जिंकण्याचा प्रयत्न करून आणि क्लबला पुढे नेऊ असे ते म्हणाले. आम्ही खेळलेल्या सर्व सामने पाहिले असेल तर अपेक्षित निकाल साध्य करण्यापासून आम्ही किंचितच दूर होतो. प्रत्येक सामन्यात एका गोलचा फरक पडला. संघाचे योग्य स्वरूप साधणे आणि सामने जिंकणे याचा मार्ग आम्हाला लवकरच गवसेल अशी खात्री वाटते, असे पेटन म्हणाले. ओदिशाचा कप्तान स्टीव्हन टेलर निलंबनामुळे एटीकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
सध्या दुसऱया स्थानावरील एटीके मोहन बागानचा मुंबई सिटी एफसीविरुद्धची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न असेल. मोसमातील आधीच्या लढतीत ओडिशा एफसीने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या, पण अखेरीस रॉय कृष्णाचा गोल एटीके मोहन बागानसाठी निर्णायक ठरला. यावेळी मुख्य प्रशिक्षक नसले तरी ओडिशाचा संघ विजयासाठी आतूर असेल याची एटीकेएमबीचे प्रशिक्षक आंतोनिया हबास यांना कल्पना आहे.
मुंबई सिटीविरुद्ध खेळतो तशाच पद्धतीने आम्हाला ओडिशाविरुद्ध खेळावे लागेल. ओडिशाची स्थिती वेगळी आहे, कारण त्यांचे प्रशिक्षक नाहीत. संघ बदलला किंवा प्रशिक्षक बदलला तर कदाचित प्रेरणा जास्त मिळते. एटीकेएमबीला मीडफिल्डर कार्ल मॅकहय़ुज याच्याशिवाय खेळावे लागेल. त्यामुळे या मोसमात एफसी गोवाला खेळलेला नवा करारबद्ध खेळाडू लॅनी रॉड्रिग्स याला पदार्पणाची संधी मिळू शकते, असे ते म्हणतात.