प्रतिनिधी/ चिपळूण
सुमारे साडेआठ कोटी खर्चून बांधलेल्या चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. साऱया तांत्रिक तपासण्यांनंतर नाटय़गृहाचा पडदा उघडण्याची वेळ आली असतानाच नगरपरिषदेने तीन कामांसाठी नव्याने सुमारे पाऊण कोटींच्या निविदा नव्याने काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपरिषदेने मात्र ही निविदा नियमानुसार व योग्य असल्याचे म्हटले आहे.
कोकणातील पहिलं बंदिस्त नाटय़गृह म्हणून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची जुनी ओळख आहे. जुलै 2005च्या महापुरात सांस्कृतिक केंद्रात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर गेली पंधरा वर्षे सांस्कृतिक केंद्र बंदच आहे. दोन वर्षांपूर्वी सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, पण धिम्याकतीने काम सुरू होते. त्यानंतर सातत्याने उद्घाटनाच्या तारखा दिल्या पण ‘तारीख पे तारीख’ उलटूनही केंद्र आजही नाटय़ रसिकांसाठी उपलब्ध झालेले नाही. यातच आता पुन्हा एकदा उर्वरित कामाच्या नावाखाली पाऊण कोटींच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईत प्रसिध्द होणाऱया एका दैनिकात सदर निविदा प्रसिद्ध झाली आहे. या निविदेत खुर्च्या पुरवणे आणि उर्वरित अंतर्गत कामाचे 32 लाख 63 हजार, ऍकॉस्टीकल वर्क तीन लाख दहा हजार, तर सिव्हिल व प्लंबिंग या कामासाठी 36 लाख 38 हजाराची निविदा काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व कामे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा दिवसांची मुदत आहे. सिव्हील, प्लंबिंग सारखी महत्त्वाची कामे असतील तर ती 15 दिवसात पूर्ण होतील का, नेमकी किती उर्वरित काम शिल्लक आहे, असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
डिसेंबरची दिवाळी पहाट, नव्या वर्षाची सुरूवात, असे सांगत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र उद्घाटनाचे मुहूर्त काढले गेले असले तरी नाटय़रसिकांना मात्र आजही नाटय़गृह उघडण्याची प्रतीक्षाच आहे. अनेक व्यावसायिक नाटकांचे दौरे चिपळूण वगळता होत आहेत. गेली पंधरा वर्षे बंद असणाऱया सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम तब्बल साडेआठ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले. आता केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा असताना सांस्कृतिक केंद्र खरेच पूर्ण झाले का, ते यंदा तरी सुरू होईल का, खरंच काही उर्वरित कामे आहेत का, असे असंख्य प्रश्न येथील नाटय़प्रेमींच्या डोक्यात सध्या गोंधळ घालीत आहेत.
तांत्रिक मंजुरीच्या विलंबाने निविदेला उशीर
सांस्कृतिक केंद्राचे काम सुरू असतानाच ते वाढत गेले. नवनवीन बदल सूचवण्यात आले. वाढीव कामाची निविदा काढण्यासाठी सभागृहात ठरावही झाला आहे. मात्र कामाच्या तांत्रिक मंजूरीला उशीर झाल्याने निविदा प्रक्रियेला उशीर झाला. मागणीनुसार खुर्च्याची संख्याही वाढवण्यात आली असून मधल्या मोकळया जागेत त्या लावल्या जाणार आहेत. काढण्यात आलेली निविदा ही वाढीव खर्चाची असून ती नियमानुसारच योग्य आहे.
सुरेखा खेराडे
नगराध्यक्षा, चिपळूण नगरपरिषद