पोलीस, वनविभागाकडून सोयीस्कर दुर्लक्ष
वार्ताहर / सातार्डा:
संचारबंदी असल्याने सातार्डा पंचक्रोशीमध्ये जंगल, माळरान परिसरात जाळे, फासे लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे. वनविभाग, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बिनधास्तपणे वन्यप्राण्यांची शिकार सुरू आहे.
संचारबंदीचे नियम मोडत समुहाकडून सकाळ, दुपारी जाळे लावून डुक्कर, सशांची राजरोस शिकार केली जात आहे. उत्तम स्टील कंपनी, मायनिंग परिसर, वेस्ट कोस्ट कंपन्यांमुळे सातार्डा, साटेली, कवठणी, किनळेतील घनदाट जंगल परिसर रिकामा झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीच्या ठिकाणी भक्ष्य पकडण्यासाठी दृष्टीस पडत आहेत. या प्राण्यांना मारण्यासाठी फासे लावण्याचेही प्रकार होत आहे. या शिकाऱयांवर कडक कारवाईसाठी वनविभागाकडून जंगल परिसरात कॅमेरे लावले आहेत. लाकूडतोड करण्यासाठी जाणाऱयांचे कोयते जप्त करून त्यांच्यावर वनविभागाकडून कारवाई केली जाते आहे. मात्र, शिकाऱयांना अभय दिला जात आहे.
माळरान जंगल परिसरात एका ठिकाणी जाळे लावून पंधरा ते वीस जणांच्या जमावाकडून सशांना हुसकावत जाळय़ात पकडले जात आहे. सशांच्या वाटांवर तारेचे फासे लावून फाशात अडकलेल्या सशांना जिवंत व मृत पकडून शिकार राजरोस केली जाते. यात तरुण पिढीचा मोठा सहभाग आहे. शासनाने परवानाधारक बंदुका ताब्यात घेतल्याने रानडुक्कर, साळींदरच्या शिकारीला आळा बसला आहे. राजरोस वन्यप्राण्यांची शिकार करणाऱयांवर वनविभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.