प्रतिनिधी/ सातारा
जिद्द चिकाटी आणि स्वतः वर विश्वास असे तर कोणताही पराक्रम अवघड नाही. हे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या (एलसीबी) महिला पोलिस मोना निकम यांनी दाखवून दिले. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक व अडचणीचा ‘हिरकणी बुरूज’ सर करत त्यांनी पराक्रम केला. नऊवारी नेसून हिरकणी सर करण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला आहे.
रायगडाच्या पायथ्यावरील वाकुसरे (वाळुसरे) या गावातील हिरा दूध विकून मिळणाऱया पैश्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली, पण तिला काही कारणाने परत जाण्यास उशीर झाला. आणि गडाचे दरवाजे बंद झाले तिने गडकऱयांना विनंतीही केली. मात्र त्यांनी गडाचे दरवाजे उघडण्यास नकार दिला. हिराला आपल्या ताह्या बाळाची चिंता लागली होती. बाळाच्या पेमापोटी हिरा या मातेने गड उतरून आपल्या घरी परतली. नंतर आपल्या बाळाला कुशीत घेतले. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना कळली, तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. महाराजांनी त्या शूर मातेचा साडी-चोळी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कडय़ावरून ती खाली उतरली त्या कडय़ावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरूज बांधण्यात आला. तो बुरूज म्हणजेच रायगडावरील ‘हिरकणी बुरूज’ होय.
बदलत्या काळात अशी थरारक कामगिरी अपवादाने होताना दिसत आहे. सातारच्या महिला पोलिस मोना निकम यांनी हिरकणी बुरूज नऊवारीमध्ये पार करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी शिलेदार ऍडव्हेंचरची तांत्रिक मदत घेतली. शनिवारी भर दुपारी त्यांनी अवघड समजला जाणारा ‘हिरकणी बुरूज’ पार करण्यास सुरूवात केली. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांना अडचणी आल्या मात्र त्या हटल्या नाहीत. साडेतीन तासात त्यांनी हा बुरूज पार केला. त्यांच्यासमवेत संचित तरडे यांनीही हा हिरकणी बुरूज सर केला. महिलांना काहीही अशक्य नसून जिद्दीच्या जोरावर सर्व काही शक्य होत असते. हे यानिमित्ताने मोना निकम, संचिता तरडे यांनी दाखवून दिले आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा पराक्रम निश्चितच अभिनंदनास पात्र ठरला आहे.