सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी / सातारा
संघर्षाला प्रयत्नांची जोड मिळाली की कोणतेही शिखर सहज पार करता येते. या प्रयत्नांच्या जोरावर शिवाजी उदय मंडळाची खेळाडु सोनाली हेळवीची भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतीय कबड्डी महासंघाने निवड केली. सोनालीच्या या यशामुळे जिह्यातील युवती, महिलांना एक प्रेरणा मिळाली आहे.
मुलगी जन्मली म्हणून वडिलांनी लग्नाचा विचार केला, तर या विचाराला मोडीत काढत आई कस्तुरी रामचंद्र हेळवी यांनी सोनाली हिच्या उज्वल भविष्याची वाट धरली. खडतर प्रवास निश्चित करत कर्नाटक सोडून त्या सातारा जिह्यात आल्या. मिळेल ते काम करत त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत सोनाली व तिच्या भावाने शेरे (ता. कराड)च्या आश्रमशाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शिक्षणाबरोबर तिला खेळाचीही आवड होती. शाळेतील तिच्या कबड्डी खेळामुळे तिला शिवाजी उदय मंडळातर्फे शिकण्याची व खेळण्याची संधी मिळाली.
या संधीचे सोनलीने सोने करुन दाखवले. लहान वयातच तिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक शालेय स्पर्धांमध्ये यश मिळवले. तिच्या या खेळामुळे तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धामध्ये होवू लागली. या स्पर्धामध्ये तिने उत्तम कामगिरी करत वयाने मोठय़ा असणाऱया खेळाडुवर आपल्या खेळाची छाप सोडली. यामुळेच तिने महाराष्ट्र कबड्डी संघाची दहा वेळा कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 16 राजस्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये ती खेळली आहे. सातारची राष्ट्रीय कबड्डीपटू सिनियर इंडिया टीमच्या ऑनलाइन प्रॅक्टिससाठी सोनालीची भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतीय कबड्डी महासंघाने निवड केली आहे.
शिवाजी उदय मंडळाच्या खेळाडु रिना चव्हाण-भिलारे, काचंन चव्हाण-सनस, सोनाली घोरपडे, अलिशा पटेल यांच्यानंतर सोनाली हेळवीला हे यश मिळाले आहे.
तिला नेहमी शशिकांत यादव, समीर थोरात, गुरूवर्य बबनराव उथळे, संग्राम उथळे,, प्रा. उत्तम माने यांच्या मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.