सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेने जिओ डिजीटल फायबर कंपनी मुंबई आणि टाटा टेली सर्व्हिसेस यांना ओएफसी केबल टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 35 रस्त्यांचे कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेच्या समोर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे.
यावेळी तालुका प्रमुख आतिष ननावरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मोहिते म्हणाले, जिल्हा परिषदेने रस्ता खुदाईला परवानगी दिली गेली. ही परवानगी मुख्य रस्ता साईड पट्टी व गटर याच्या पलिकडून शासकीय रस्त्याची उर्वरित हद्दीत उर्वरित हददीत टाकण्यासाठी आहे. त्याच पद्दतीने खोदलेली चारी तशीच पूर्ववत करुन देण्याची कंपनीची जबाबदारी आहे. परंतु संपूर्ण जिह्यात हे काम जिल्हा परिषद उपअभियंता यांच्याकडील शाखा अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार करुन घेण्याचे आहे. खोदकामामुळे नुकसान झाल्यास कंपन्या जबाबदार आहेत. इतर काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु कंपनीने शासनाचे नुकसान केले आहे.
साईड पट्टी खोदून ओएफसी केबल टाकली आहे. कोणत्याही प्रकारे ती चारी तशीच बुजवून टाकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांच्या मालकीच्या रस्त्याचे खोदाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे शेकडो कोटीचे नुकसान या कंपनीने केले आहे. या नुकसानीची भरपाई वसुल करण्यात यावी, तात्कालिन जिल्हा परिषद सीईओ यांनी याकडे दुर्लक्ष केले. विद्यमान सीईओंनी याकडे लक्ष द्यावे, कारवाई करावी, अन्यथा दि. 1 फेब्रुवारीला शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.