बसचे नामकरण झाशीची राणी लक्ष्मीबाई केले, जिल्ह्यातील गडकिल्यांची नावे टाकली
सातारा ते पुणे दरम्यान प्रवासातल्या ठिकाणांची माहिती चित्रात मांडली
प्रतिनिधी / सातारा
सोशल मीडियावर अनेक ग्रुप असतात. कोणी त्या ग्रुपच्या माध्यमातून सदुपयोग करत तर कोणी सोयीनुसार करत. साताऱ्यात इन क्रेडिबल नावाचा आठ जणांचा ग्रुप आहे. या ग्रुपने प्रवाशांना सेवा देणाऱ्या बसलाच रंगवले नटवले अन् तिचे बारसे घालून तिचे नामकरण ही झाशीची राणी लक्ष्मीबाई असे ठेवले आहे. या बसवर सातारा ते पुणे या दरम्यान प्रवासात येणारी ठिकाणे चित्र रुपात दाखवण्यात आली आहेत.
सध्या एसटी कर्मचाऱ्यांची खूप वाताहत सुरू आहे. कोरोनाच्या काळात मजुरांना त्यांच्या घरी सोडण्याचे काम एसटीने केले. जिथे कोण नाही तिथं एसटी असते याचा प्रत्यय सर्व्हे करायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आला होता. त्यांना सर्व्हेला एसटीने इच्छित स्थळी नेले होते. आता मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार नाही. बस सेवा सुरू केली पण प्रवासी नाहीत अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी इन क्रेडिबल सातारा हा ग्रुप पुढे आला. या गृपचे संतोष बल्लाळ, वैभव गुरसाळे यांच्यासह आठ जण एकत्र येऊन सातारा आगारातील बस रंगवली. बसवर जिल्ह्यातील गडांची नावे टाकली.सातारा ते पुणे या प्रवासात लागणारी ठिकाणे टाकली.
या उपक्रमाबाबत माहिती देताना संतोष बल्लाळ म्हणाले की, एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर वैभव बल्लाळ म्हणाले, आमचा ग्रुप इन्स्टाग्रामवर सुरू झाला. ग्रुपच्या माध्यमातून अनेक सोशल ऍक्टिव्हिटी केल्या आहेत. पूरग्रस्तांना गतवर्षी मदत केली आहे. यावर्षी मास्क वाटप केले आहे, बसला झाशीची राणी अस नाव का दिलं तर धावडशी हे नाव त्यांच सातारा जिल्ह्यातील म्हणून नाव दिल्याचे सांगितले. आगार प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी प्रवाशांची काळजी आगराच्यावतीने घेण्यात येत असल्याचे सांगितले.