प्रतिनिधी/ सातारा
कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सातारा आणि कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून एकूण 167 बंदीवानांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. संबंधित कारागृहांना जामिनावर मुक्त केलेल्या बंदीवानांना कोरोना संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन घरी पोहचवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
सातारा आणि कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातील 573 अंतरिम जामीन अर्ज प्राप्त होते. त्यापैकी 188 अंतरिम जामीन अर्ज मंजूर झालेले आहेत. अर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठवून जामीन अर्जाचे कामकाज पाहण्यासाठी मोफत विधिन्य यांची नेमणूक करण्यात आली होती. 23 मार्च ते 15 जून या कालावधीत मंजूर अंतरिम जामीन अर्ज कागदपत्रांची पूर्तता करून एकूण 167 बंदीवानांना मुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा व सत्र न्यायालय इमारत व परिसर निर्जंतुकीकरण करून घेण्यात आला आहे. तसेच न्यायालयाचे कामकाज सकाळी 11 ते 2 व दुपारी 2. 45 ते 5.45 असे दोन सत्रामध्ये सुरु करण्यात आले आहे. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून थर्मल स्कॅनद्वारे तपासूनच प्रवेश दिला जात आहे. सर्व न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर बसवण्यात आले आहेत.