रूग्ण, नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा रूग्णालयात ड्रेनेजचे पाणी व मैला रस्त्यावर आले आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून ड्रेनेज लाईन दुरूस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, चार महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. यांचा नाहक त्रास रूग्ण, नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर यांना होत आहे.
सदर बझार परिसरात जिल्हा रूग्णालय असून, या ठिकाणी अतिदक्षता विभागासह 10 ते 12 वार्ड आहेत. जिह्याच्या विविध भागातून रूग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वार्डबॉय मोठ्या संख्येने काम करत असतात. रूग्णालयात अध्यावत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
सप्टेंबर 2019 मध्ये जिल्हा रूग्णालयातील बर्न व प्रसुती विभागात आयसोलेशन विभाग केला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. त्याच इमारतीच्या ड्रेनेजमधून सांडपाणी व मैला भरून वाहत असल्याने नगर पालिकेकडून सुरक्षा टँक मोकळा करून घेतला आहे. तरी सुद्धा पुन्हा ड्रेनेजमधून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी पत्र व्यवहार करून सुद्धा यांची दखल बांधकाम विभागाने घेतलेली नाही. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गधी पसरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आहे. तरीही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यांचे गांभीर्य नसल्याचे वारंवार समोर येत आहे.