वाठार किरोली / वार्ताहर:
टकले ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी आपल्या मातीत वाढलेल्या पण बाहेरगावी जाऊन स्वकर्तुत्वावर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या गावचे नाव उज्ज्वल केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा केलेला सन्मान हा परिसरातील गावांना एक आदर्श आहे. असे सोहळ्याचे नियोजन प्रत्येक गावी केले तर पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि त्यातून कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण होऊन गावे समृद्ध होतील असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांनी व्यक्त केले. टकले ता. कोरेगाव येथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यावतीने गावातील विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये ऑननरी कॅप्टन विठ्ठल तुकाराम भोसले, पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ नामदेव भोसले, रमेश नारायण घाडगे, राजेंद्र रमेश घाडगे, रामचंद्र महादेव घाडगे, सदाशिव रामचंद्र घाडगे, चंद्रकांत गणपती घाडगे, यांचा साहित्यिक प्रा. व.बा. बोधे यांच्या शुभहस्ते आणि सरपंच मनीषा प्रशांत घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच शोभा खुटेकर , ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सैनिक, महिला, गावातील तसेच विभागातील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. बोधे यांनी टकले ग्रामपंचायतीने राबविलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या विविध क्षेत्रात काम करत असूनही आपल्या मातीबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरवपूर्ण उल्लेख करून व्याख्यान दिले. त्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला. सत्कारमूर्तीनी केलेल्या मनोगतात आपल्या सेवेबद्दल माहिती देऊन सन्मान केल्याबद्दल ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले. सूत्रसंचालन जयहनुमान घाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दिपक खुटेकर, प्रशांत घाडगे, ग्रामसेवक किरण कंठे व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.