गृहराज्यमंत्री शंभुराज यांच्या प्रशासनाला सूचना
प्रतिनिधी / नवारस्ता
पाटण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ज्याप्रमाणे आपण ऑक्सिजनसह ३५ बेडचे कोविड रुग्णालय सुरु केले आहे. त्याचप्रमाणे पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये आपण लोरिस्कमधील कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करुन घेत आहोत. त्याठिकाणी ऑक्सिजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करा. त्याठिकाणी लागणारे २५ बेड दोनच दिवसात उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. लागणारे २५ ऑक्सिजन सिलेंडर हे स्व. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बुधवारपर्यत उपलब्ध करुन दिले जातील त्यामुळे या कामास लवकर सुरुवात करा आणि येत्या बुधवारपर्यंत काम पुर्ण करा अशा सुचना आज गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या कोवीड संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव, कोयनानगरचे सपोनी एम. एस. भावीकट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.