६० लाखाची खंडणी मागणाऱ्या महिला पोलिसांच्या जाळयात स्वंतत्र्याचा गैरवापर वाढलाय : महिलाकडून पुरूषांचे शोषण
गौरी आवळे / सातारा
अश्लिल व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात आले. या घटनेने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. शिक्षण, स्वतंत्र, समानता, सक्षमीकरण या पाठोपाठ महिला गुन्हेगारीत ही पुरुषांच्या बरोबरीने चालत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका भयानक आहे. यांची प्रचिती अनेकांना आली आहे.
गेल्या काही वर्षापासून खंडणी, खून, फसवणूक, चोरी, अपहरण, धमकी देणे, अत्याचार, अशा गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हेगारीचे क्षेत्र म्हटलं की, फक्त पुरूषांचे नाव पुढे येत असते. मात्र बदलत्या काळाप्रमाणे महिलांही गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वाटचाल करत आहेत. यांची प्रचिती नुकतीच साताऱ्यात घडलेल्या घटनेवरून आली. तीन महिलांपैकी एका महिलेने डॉक्टरशी सोशल मीडियावर चॅट आणि व्हिडिओ कॉलिंग केले. मात्र व्हिडिओ कॉलिंग करत असताना दोन्ही बाजूनी संमतीने जे काही घडले. यांचा फायदा घेत महिलांनी डॉक्टरांना अश्लिल व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन ६० लाखांची खंडणी मागितली. यामुळे डॉक्टरांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये महिला विरूद्ध तक्रार दाखल केल्यानंतर संबधित महिलांना पोलीसांनी अटक केली.
सातारा शहरात पहिल्यांदा असा प्रकार घडला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेही असतील, मात्र उघडकीस आले नसतील असा दावा करण्यास काहीच हरकत नाही. या घटनेमुळे महिलांना मिळालेले स्वतंत्र्य कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. उच्च शिक्षण घेवून महिला स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत आहेत. तर यातील काही महिला याच शिक्षणाचा गैरवापर करत आहेत. यामुळे समाजातील महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. पुरूषाकडून महिलांचे शोषण करण्याच्या घटना घडत असताना आता पुरूषही शोषणाला बळी पडत आहेत. यामुळे कायदे कडक फक्त महिलांसाठी आहेत. पुरूषांना काय न्याय मिळणार असा विचार समाजात निर्माण झाला आहे.
सोशल मीडिया आणि गुन्हेगारी
सोशल मीडियाचा वापर जेवढा चांगला तेवढा वाईट ठरत आहे. यांचा वापर करताना नियम पाळणे ही गरजेचे आहे. तरीही काही लोक यांच्या आहारी जावून चुकीची पावले उचलतात. आणि यांचा फटका त्यांना सोसावा लागतो. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यातून गुन्हेगारीत वाढ होत आहे.