पडळ साखर कारखान्यातील मारहाण प्रकरण
प्रतिनिधी / वडूज :
पडळ ता.खटाव येथील के.एम. शुगर कारखान्यातील वरिष्ठ अधिकारी जगदीप धोंडीराम थोरात (वय 40,रा. गोवारे,ता. कराड) यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे, को चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्यासह आठ तर अनोळखी दहा ते बारा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मयत जगदीप थोरात व अन्य काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने अफरातफर केल्याच्या कारणावरून जनरल मॅनेजरला ऑफीसमध्ये बोलावून घेऊन बुधवार दि. 10 रोजी सायंकाळी साडे पाच ते आठच्या दरम्यान फारबर काठी, लाकडी काठी, ऊस व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना कराड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी त्यांचा गुरूवारी दि. 11 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या कारखाना पदाधिकारी व प्रशासनावर कठोर कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा मयताचे नातेवाईक तसेच गोवारे ग्रामस्थांनी घेतला होता.
विक्रम आकाराम पाटील (रा.कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिलेल्या माहितीवरून, कराड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भरत तुकाराम पाटील यांनी गुन्हा दाखल केला. पडळ कारखाना वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सखोल चौकशीअंती थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, कृष्णात शेडगे (मामा), सनि क्षीरसागर, अंजनकुमार घाडगे, अशोक नलवडे, आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील सर्व संशयितांच्या विरोधात भादंवि कलम 302, 143, 147, 148,149,323 लावण्यात आले आहे. तर घोरपडे बंधूंसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.