अपशिंगे मंडल कार्यालयाचा अजब कारभार
प्रतिनिधी / नागठाणे :
अपशिंगे (मि.) ता.सातारा येथे रस्त्याच्या कामांसाठी मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली येथील महसूल विभागाने अडवले होते. मात्र, तहासिलदारांचा नुसता फोन आल्यावर त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता दोन तासांनी त्यांना सोडून देण्यात आले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
इतरवेळी सर्वसामान्य शेतकऱ्याने वावरात लेव्हलींग जरी केले तरी त्यांचे जेसीबी, ट्रॅक्टर उचलून आणत त्यांच्यावर कारवाई करण्यात तत्पर असलेले येथील महसूल विभाग मात्र या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रोल्यावर व ठेकेदारावर का मेहेरबान झाले? याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून अपशिंगे मंडलाचे कर्मचारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? अशी चर्चाही सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या महिनाभरापासून अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एका खाजगी ठेकेदारामार्फत सुरू आहे.या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या साईडपट्ट्या भरण्यासाठी हा ठेकेदार रस्त्यालगतच चर काढून तेथील मुरूमाचा वापर करत आहे.
सोमवारी दुपारी अपशिंगे मंडलाचे तलाठी निलेश जाधव, नांदगावचे तलाठी उमेश पाटणकर व वेणेगावचे तलाठी कैलाश भोसले यांनी अशी मुरूम वहातुक करणारे दोन ट्रॅक्टर अडवले.त्यांच्याकडे मुरूम वाहतुकीचा परवाना, रॉयल्टी भरलेल्या पावत्यांची मागणीही केली. मात्र ट्रॅक्टर चालकांकडे याबाबतचे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सुमारे दोन तास याबाबत त्यांनी चौकशी केली.
दोन तासानंतर या तलाठ्यांनी मुरूम वाहतूक करणारी ही दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली कोणतीही कारवाई न करता सोडून दिली. याबाबत अधिक माहिती घेतली असता तहसीलदार मॅडमचा एक फोन आल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचे समजते.इतरवेळी सर्वसामान्य शेतकऱ्याने स्वतःच्या रानात माती लेव्हलींग करताना वहातुक केली तरी रॉयल्टी, नियमांचा बडगा दाखवून कारवाई करत त्यांची वहाने जप्त करण्याची तत्परता दाखविणाऱ्या या मंडल कार्यालयाने सोमवारी अडविलेल्या या दोन वाहनांजवळ तसेच ठेकेदाराच्या माणसाजवळ कोणतीही कागदपत्रे नसताना वरिष्ठांच्या एका फोनवर सोडून देण्यात धन्यता मानली.त्यामुळे सातारा महसूल विभाग या ठेकेदारावर एवढा प्रसन्न का? याचीच खुमासदार चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.