प्रतिनिधी/नागठाणे
बोरगाव पोलिसांनी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क न लावता हिंडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे परिसरात विना मास्क फिरणाऱ्यांमध्ये खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसात विनामस्क फिरणाऱ्यांकडून ५५,५०९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर अतीत येथील एकविरोधात कलम १८८अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. एकीकडे प्रशासन जनतेला सोशल डिस्टन्शनचे पालन करून तोंडाला मास्क लावण्याच्या सूचना करत असतानाच दुसरीकडे मात्र काही लोक विना मास्कचे फिरत आहेत.अशा लोकांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
बोरगाव पोलिसांनी नागठाणे परिसरातील गावांमधून विनामास्क फिरणाऱ्या १११ जणांवर दंडात्मक कारवाई केली.यावेळी प्रत्येकाकडून ५०० रुपये प्रमाणे सुमारे ५५,५०० रुपयांचा दंड वसूल केला.
तर अतीत (ता.सातारा) येथील संतोष संभाजी जाधव (वय.४३) हा विनामास्क,ट्रीपलसीट जाताना आढळून आल्याने व त्याने दंड भरण्यास नकार दिल्याने त्याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८,१८६,५०६,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) ,महाराष्ट्र कोविड १९ विनियमन कलम ११ ,साथरोग प्रतिबंध अधिनियम १९८७ चे कलम ३ व मोटार वाहन कायदा कलम १२८ /१७७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सपोनि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली.