गोडोली / प्रतिनिधी :
प्रांत कार्यालय परिसरात अनेक कार्यालय असल्याने दिवसभर शेकडो नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, एका अधिकाऱ्यांच्या सुपिक डोक्यातून रस्तालगत वीटा लावून पार्किंग व्यवस्था करण्याची आयडियाच आता अडचणीची झाली आहे. पार्किंग व्यवस्था व्हावी, हि सतत नागरिक मागणी असून प्रांताधिकारी, तहसिलदार यांना ती करण्यात अपयश आले असून त्याविरोधात सर्व पक्षीय आंदोलनाचा इशारा प.स.सदस्य प्रविण धस्के, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.’पार्किंगसाठी साताऱ्यात आंदोलन झालेचं पाहिजे,’अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोवई नाका परिसरात ग्रेड सेप्रेटर, स्टँड, मंडई परिसरात वाहन पार्किंगसाठी कुठे हि जागा नाही. प्रांत कार्यालयात तर दाटीवाटीने वाहने उभी करावी लागत असल्याने नागरिकांना चालणे हि मुश्कील होते. येथे नियुक्ती झाल्यावर पार्किंग प्रश्न सोडवण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्यांने मोठा खर्च करून रस्त्याच्या बाजूला वीटा उभ्या केल्या. नो पार्किंग बोर्ड लावले, वाहने उभी कुठे करता येतील त्या जागा निश्चित करून त्याचा मिडीयावर गाजावाजा केला. मात्र त्या अधिकाऱ्यांची पार्किंग व्यवस्था आयडियाचं सध्या चांगलीच अडचणीची झाली आहे. याच अधिकाऱ्यांने वाहतूक पोलिसांच्या क्रेनला वाहने उचलायला आदेश दिले आहेत.
सोमवारी वाहतूक पोलिसांच्या क्रेनवरील कामगाराने कामानिमित्त आलेल्या निनाम गावच्या एका नागरिकांला मारहाण केली. यावेळी सोबत असलेल्या वाहतूक पोलिसांने त्या पादचाऱ्यांने मारहाण केल्याचा कांगावा करत कामदयाचा धाक दाखवून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पंचायत समितीचे सदस्य प्रविण धस्के आणि शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या सह उपस्थित अनेक नागरिक त्या पादचाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. यावेळी प्रकरण चांगलेच तापले असताना या परिसरातील प्रांत, तहसिलदार, अन्य प्रमुख अधिकारी समोर आले नाहीत.त्यांनी यावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली, मात्र पार्किंग व्यवस्था करण्याची धमक नसलेला एकही अधिकारी या परिसरात नाही, असा आरोप अनेकांनी केला. आता प्रांत कार्यालय परिसरातील पार्किंग व्यवस्थेसाठी सर्व पक्षीय आंदोलन करणास असल्याचे पंचायत समिती सदस्य, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख यांच्या सह अनेकांजण एकवटले असून सगळेच म्हणतात, ‘आंदोलन झालेचं पाहिजे.’